पान:Gangajal cropped.pdf/122

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.१३० / गंगाजल

कधी मृत्यू येऊन आपल्याला गाठील, याची त्यांना किती भीती वाटे, हे सुरुवातीलच्या काळात आसपासच्या माणसांना प्रकर्षाने जाणवे.
 त्यांचा पंढरीचा विठोबा त्यांना बळ देत होता, की त्यांचे आत्मसामर्थ्यच एवढे मोठे होते, हे सांगणे कठीण; पण मृत्यूच्या या भीतीवर त्यांनी मात केली होती.
 एकाकी' हा एक उत्तम-कलात्मक निबंध आहे.
 ‘एकाकी' मध्ये त्यांना झालेले एकाकीपणाचे ज्ञान, त्या ज्ञानाची, तेजाच्या लोळाची प्रखरता प्रकर्षाने जाणवते, ती ‘भटके' आणि एकाकी' हे निबंध एकाच वेळी वाचले म्हणजे.
 माणूस जगात एकटाच येतो आणि एकटाच जातो. त्याचे सुखदु:ख भोगायला जन्माचा सोबती, मुले, लेकरे, सगेसोयरे असे कितीही वाटेकरी जोडले तरी हा सुखदु:खांचा भार ज्याचा त्यानेच उचलावा लागतो. जो-तो ख-या अर्थाने एकटा असतो; एकाकी असतो. हे समजणे आणि उमजणे यात फरक असतो. अलीकडे हे बाईंना उमजले होते, असे त्यांच्या बोलण्यावरून वाटते.
 ‘किंकाळी' हा उत्तम ललित-निबंध तर आहेच, पण त्यात अॅब्सर्डिटीचा धागा आहे.
 किंकाळी'सारख्या लेखात दिसते की, चुक आणि बरोबर हे सापेक्ष असते. नुसते एका प्रसंगापुरते नसते, तर जन्मभर आपण जे करीत आलो त्यात चूक किती आणि बरोबर किती, याचे परिशीलन करणे कधी संपतच नाही. बाई सगळ्या आयुष्याला चूक-बरोबरच्या खात्यात बसवून उलट-सुलट विचार करीत असत. स्वत:च्या चिंतनात त्यांनी स्वत:चे जीवन परीक्षेसाठी, कसोटीसाठी ठेविले होते, आणि शेवटी त्या अशा निष्कर्षाला आल्या होत्या की, आपण आपल्याला योग्य वाटेल ते कर्तव्यबुद्धीने स्वत:शी प्रामाणिक राहून केले. याच्या पलीकडे ज्या चुका झाल्या असतील, त्यांचे परिणाम आपण भोगलेच पाहिजेत. कारण सर्वार्थानी बरोबर असे वागता येत नाही. निदान आपल्याला तरी ते साधलेले नाही, ही त्यांना झालेली जाणीव त्या सहज सांगून जातात.
 'उकल'मध्ये असाच स्वत:शीच चाललेला स्वत:चा झगडा त्यांनी मांडला आहे. १९५९-पासून त्यांना मृत्यूची जाणीव तीव्रतेने झाली होती; पण मृत्यूच्या भीतीने हातपाय गाळून न बसता त्या नव्या उमेदीने कामाला