पान:Gangajal cropped.pdf/120

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२८ / गंगाजल

त्यांचे रूपांतर होताना मी पाहिले आहे. आणि त्या-त्या लेखामागची त्या- त्या वेळची बाईंची मनोवृत्ती मी ब-याच जवळून पाहिली आहे.
 मी जे काही लिहीन, त्याहून सर्वस्वी निराळे असे सूत्र दुस-या कोणास सापडले, व त्याने ते मांडले, तर त्यात मला आनंदच आहे. 'परिपर्ती' व ‘भोवरा' हे ललित निबंध संग्रह एकाच वेळी वाचले म्हणजे आपोआपच एक ठळक गोष्ट लक्षात येते. या संग्रहातून बाई स्वत:च्या जीवनाबद्दल आणि स्वत:च्या विचारसरणीबद्दल खूपसे काही सांगून जातात.
 भोवरामधील ‘सुटका' या लेखात त्यांनी ते जास्त स्पष्टपणे सांगितले आहे.
 "एका माणसाची आयुष्याची कमाई किती असणार? ती कमाई करताना अनुभूतींचा प्रवाह तुडुंब भरून वाहून चालला की, मनुष्य आपण होऊन दुस-याला बोलावते, व आपली कमाई वाटीत सुटते."
 बाईंच्या अनुभूतीचा प्रवाह तुडुंब भरून वाहून जाऊ लागला की, बाई सांगायला लागतात. मग त्यांना कुणी आग्रहही करावा लागत नाही.
 'गंगाजल'मधील ललित-निबंधांत बाईंची अनुभूती कुठे सापडते का हे पाहू गेले की, ‘बॉय फ्रेण्ड'पासूनच त्याच्या खुणा दिसू लागतात. बाई स्वत: होऊनच आपले आणि पंढरपूरच्या विठोबाचे नाते सांगतात. त्यात भक्ताचे विविध प्रकार सांगताना आर्त होऊन पंढरपूरला जाणा-या बाई एकीकडे अर्थार्थीही असतात.
 सोसवेनासा भार शिरी पडला की, त्यांना हरी आठवतो. एकाकीपणे प्रसंगाला तोंड देण्याचा प्रसंग आला की, बाई पंढरपूरच्या विठोबाजवळ बळ मागायला जातात. आलेला प्रसंग सोसायचे सामर्थ्य दे, म्हणून काकुळती येऊन त्याला मिठी मारतात. बाईंची ही काकुळती लौकिक नसते. व्यावहारिक अर्थाने त्यांना काही मागावयाचे नसते. माणसाच्या भावजीवनाची गुंतागुंत मोठी विलक्षण असते. माणूस जवळ आला आणि स्वत:ला विसरून आपण त्याच्यावर प्रेम करू लागलो (मग ते प्रेम स्वत:साठी का असेना), की, ही व्याकुलता, हे रडणे-हसणे सगळे आलेच.
 कधी कधी ही गुंतागुंत फारच वाढते. तीतील सुटा धागा कुठे सापडत नाही. अशाही काही प्रसंगी बाई आपल्या जिवलगाला भेटण्यास जात आणि ब-याचशा शांत होऊन परत येत, असे मला ब-याच वेळा जाणवले आहे.
 बाईंच्या मनात जीवनासंबंधी अपार श्रद्धा होती. देवळाविना गाव