पान:Gangajal cropped.pdf/12

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
दोन :
देवळाविना गाव



 गेले काही दिवस आम्ही रोज त्या रस्त्याने जात होतो. एके ठिकाणी एक नवी बस्ती घडत होती. आमच्या डोळ्यांसमोर नवी नबी लहान घरे निर्माण होती. हळूहळू सर्व वसाहत बांधून झाली. बर्‍याच घरांतून कुटुंबेही राहायला आली. वसाहतीच्या एका अंगाला काही न बांधलेली अशी एक मोकळी जागा शिल्लक होती; एक दिवस तेथेही पाया खणला गेला. बाकींच्या घरांसारखा तो दिसला नाही. पाहता पाहता एक लहानसे देऊळ उभे राहिले. एक दिवस आमच्या जायच्या वेळेला देवळाच्या पटांगणात गर्दी दिसली. मारुतीची प्रतिष्ठापना चालली होती. परत आलो, तो त्या देवळात आमच्याकडे तोंड करून मारुती उभा!

 ‘आणखी एक नवे देऊळ! पुण्यात काय देवळे कमी आहेत?”

 ‘‘अग, पण ह्या नव्या वस्तीला कुठे होते देऊळ? आता इथल्या लोकांना दर्शनाला यायला, संध्याकाळचे टेकायला जागा झाली."

 तुझे आपले. काहीतरीच. कुठे लहान वस्ती झाली, तर लगेच देवळाची काय गरज? शिवाय, पहाटेच्या आणि रात्रीच्या भजनाने लोकांचे डोके उठायचे !’’

 मी हसले आणि पुटपुटले, ‘कोइल इल्ले उरिल. कूडी इरक्क वेण्डाम्"

 ‘‘तोंडातल्या तोंडात काय म्हणतेस?’

 ‘‘काही नाही, एक तामिळ म्हण आठवली" मी ती म्हण परत म्हणून दाखविली, आणि तिचे शब्दशः भाषांतर केले, “देवळाविना गावात घर असू नये' कोण जुन्या काळचा मनुष्य होता कोण जाणे! पण त्याला वाटले की,