पान:Gangajal cropped.pdf/115

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१२२ / गंगाजल


 "ज्यांनी वाममार्गाने पैसे मिळविले, लाच घेतली, असं तुला वाटतं त्यांचा तुझा कधी संबंध येऊ द्यायचा नाही. असं कटाक्षानं वागणं तुला शक्य आहे का?"

 "नाही." मी परत कबुली दिली.

 “देशात सर्व जातींनी, सर्व धर्मांनी एकत्र नांदावं, असं असताना परिस्थितीचा बऱ्याचदा विपर्यास करणारे, भडक प्रचार करून तरुणांची मनं भडकविणारे लोक तुझ्या ओळखीचे आहेत ना?"

 मी परत "होय" म्हटले व त्रासून विचारले, “काय, मी रानात जाऊन राहू? का जीव देऊ?"

 “तसं केलंस, तरच तुला अलिप्तपणाचा आव आणता येईल, एरवी नाही. आपल्या कामापुरता,- जास्त नाही,- एवढा जरी व्यवहार तू ठेवलास तरी तेवढ्यापुरती तुझी त्या माणसांच्या कृत्यात भागीदारी होतेच की. अशा त-हेचा सतत प्रचार ज्यूंविरुद्ध चालला होता, हे तुला माहीत आहे. येथील वातावरण अजून तितकं तापलेलं नाही. पण जर्मनीत झालेल्या प्रकाराची येथे पुनरावृत्ती होणार नाहीच असं काही म्हणता येणार नाही, हे खरे ना? अशाच प्रचाराने गांधींचा खून झाला ना? महात्मा गांधींच्या वधाचे निमित्त करून किती घरांची महाराष्ट्रात होळी झाली? एवढंसं निमित्त होऊन भयानक जातीय दंगे भारतात झाले ना?"

 मी आपली 'होय', 'होय' म्हणत होते, पण अजून संपले नव्हते. "ही सर्व द्वेषाची बीजं नाहीतशी करण्याचे तू किती प्रयत्न केलेस? त्याच समाजात, त्याच लोकांत तू आपलं संभाळून, कातडी-बचावाच्या धोरणाने राहिली आहेस ना? मग जगात, तुझ्या स्वत:च्या समाजात, ही गुन्हेगारी चालली आहे व जे गुन्हेगार आहेत, त्यात आपला काही भाग नाही, हे म्हणण्यात काय अर्थ आहे? ते तूच आहेस. कर, आठवण कर. याज्ञवल्क्य काय म्हणाला, ते सबंध आठव ना."

 मी जडपणे पाठ म्हटला, “एवं वा अरे अयमात्मा अनन्तर: आबाह्य: कृत्स्नः प्रज्ञानघन एव... यत्र हि द्वैतमिव भवति तदितर: इतरं पश्यति।"

 "अग, ह्याप्रमाणे हा आत्मा सर्व बाहेरच असतो, तसाच सर्वस्वी आतला असतो. द्वैतभावना असेतोपर्यंतच बाहेरचे इतर परके वाटतात. पण सर्वत्र आत्मा ज्ञानमय, ज्ञानाचाच बनलेला आहे."

 जाणीव वा ज्ञान ही गोष्ट कधीतरी सुखदायक असते का? ज्ञानाच्या