पान:Gangajal cropped.pdf/111

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

११८ / गंगाजल


त्यांची प्रवृत्ती ह्यांचा विचार करितो आहोत, - जणू काही गुन्हेगार म्हणजे आपल्यापेक्षा काहीतरी निराळे, काहीतरी लोकविलक्षण म्हणून. पण ते खरं नाही. मानवाच्या- तुमच्या, माझ्या, सर्वांच्या-प्रवृत्ती सगळीकडे सारख्याच असतात. सुस्थितीत राहण्यासाठी स्वत:ला, बायकोला, मुलांना खाणेपिणे, कपडेलत्ते नीट मिळावे, असं सर्वांनाच वाटतं. अगदी ह्याच साधारण प्रवृत्ती गुन्हेगारांच्याही असतात. आपल्यापेक्षा मानाने, वयाने, शिक्षणाने, अधिकाराने मोठे असतील, त्यांचं म्हणणं ऐकावं, हीही सामान्य प्रवृत्तीच आहे, आणि तिचा फायदा राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात वडील माणसं व पुढारी घेतातच. खुनी फक्त पैशासाठी खून करितो, सूडासाठी करितो, असं थोडंच आहे? धर्मवेडाने, देशप्रेमानेही माणसं दुसऱ्यास मारावयास प्रवृत्त होतात."

 “तुमचं म्हणणं असं की लढाई म्हणजे खूनच?" वर्गातील एक आवाज.

 "प्रश्न विचार करण्यासारखा आहे, पण आज आपला विषय आहे समाजातील गुन्हेगारी. तेवढ्यापुरताच आपण विचार करू."

 "तुमचं म्हणणं असं की धार्मिक भावना, पितृप्रेम, देशप्रेम ह्या उदात्त प्रवृत्तीही गुन्हेगाराला प्रेरक होतील?" दुसरा आवाज.

 “माणसं काही वेळा भावनेने भारून जातात. गुरू, पुढारी, वडील माणसं जे सांगतात, ते करून जातात. आपली स्वत:ची अशी मूल्यं आहेत, आपल्या धार्मिक मूल्यांचा विचार करून त्यातली काही तरतमभावाने स्वीकारण्याचा आपला हक्क आहे, हे माणसं विसरतात. इतर विचार, नोकरी, सुखी जीवन हीही अशा गोष्टी विसरायला मदत करतात. पूर्वी माणूस राजाच्या नोकरीत राहिला म्हणजे आपल्या आश्रयदात्याचं ऐकण्यात भूषण मानीत असे. जीव देणं व घेणं ह्या गोष्टी त्याच्या लेखी सारख्याच होत्या. परमभक्तीचं एक लक्षणच असं आहे की, मनुष्य सर्वथा दुसऱ्याचा होतो. अशा मन:स्थितीतही गुन्हा होणे शक्य आहे. नुसतं शक्य आहे, इतकंच नव्हे, तर महाभयंकर गुन्हे झाल्याचं इतिहासात नमूद आहे. युरोपात मध्ययुगात ख्रिश्चन धर्माच्या नावाने 'इन्क्विझिशन' या संस्थेमार्फत कित्येक वर्ष लोकांचे अनन्वित हाल झाले. तिची आपल्या इकडे गोव्यामध्येही झळ लागली. मनुष्यजातीविरुद्ध ही एक भयानक गुन्हेगारीच होती, आणि धर्मवेडाने उत्पन्न झालेली होती."