पान:Gangajal cropped.pdf/110

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / ११७


शेपूट हलवीत पुढ्यात आला. “तोपण तूच आहेस.' “होय. खरंच." मी म्हटले. बागेतल्या बकुळीच्या झाडाची बकुळे खात एक कोकीळ बसला होता. मला पाहताच उडून गेला. “तो तूच आहेस."

 माझी करमणूक चालूच होती. काही दिवसांनी मी महाबळेश्वराला गेले. एका संध्याकाळी कुठल्याशा टोकाला जाऊन समोरच्या डोंगरांच्या रांगांतील सूर्यास्त पाहात बसले होते. खाली थिजलेल्या दगडांच्या अफाट लाटा, वर निळ्या आकाशात रंगीबेरंगी ढगांच्या लाटा व कुठेतरी अधांतरी मी! "ते सर्व तू आहेस." माझे मन आनंदाने अगदी उतू चालले होते. सूर्यास्ताशी होणारी एकात्मता त्याला एकदम पसंत होती. आणि ह्या आनंदात भर टाकायला एक उपनिषद मदतीला धावलेच. “हे सूर्या, लोकांचे नियमन करणाऱ्या. लोकांच्या जन्मदात्या, आपले प्रखर किरण एकत्र आण. त्याना आवर. तुझे सौम्य कल्याणकारी रूप मला पाह दे. त्यात जो पुरुष आहे ना, तो मीच आहे." मी परत-परत जिभेवर घोळवीत मिटक्या मारीत हा जुना श्लोक म्हणत होते. विश्वाशी झालेल्या एकात्मतेचा मला कैफ चढला होता.

 मी पुण्याला परतले होते. रोजच्याप्रमाणे वर्तमानपत्र चाळीत होते इस्रायलमध्ये चाललेल्या आइश्मान् खटल्याची हकीकत होती ती. लक्षावधी निरपराधी लोकांना-अर्भकांना, स्त्रियांना, पुरुषांना-हाल करून नात्सी लोकांनी मारिले. ही गोष्ट मला माहीत होती. पण एका मनुष्याने काय क्रूरपणा केला, ती हकीकत वाचवत नव्हती. ह्या हत्येत मारले गेलेले माझे जर्मन मित्र मला आठवले. पळून गेल्यामुळे ज्यांचा जीव वाचला, पण आयुष्य कायमचे मातीमोल झाले, अशा मैत्रिणी डोळ्यांसमोर आल्या. त्याच्या मारेकऱ्यांबद्दल मन त्वेषाने उफाळून निघाले. "तेही तूच आहेस." विजेचा चटका बसला. छे! छे! कदापि नाही. ज्याच्याबद्दल मला इतकी घृणा वाटते, इतका त्वेष वाटतो, ते मी कधीही असणे शक्य नाही. अंगी चिकटू पाहणारे हे किळसवाणे झुरळ मी जोरात झटकून टाकिले. मन बिचारे गप्प बसले.

 रोजचा व्यवहार चालूच होता. विषय शिकवायचा होता समाजातील गुन्हेगारीबद्दलचा. माझी जीभ विवेचनात अगदी रंगून गेली होती. "ज्यांना आपण गुन्हेगार म्हणतो ना, ते समाजाचेच घटक आहेत. सामाजिक परिस्थिती व समाजाची बांधणी हीसुद्धा इतर गोष्टींबरोबरच गुन्ह्याला कारणीभूत होतात. तुम्ही, मी, सर्वजण आज ह्या दालनात बसून गुन्हेगार व