पान:Gangajal cropped.pdf/109

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

११६ / गंगाजल

 ‘आत्म्याच्या, म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे स्वत:च्या प्रेमाखातर? तापीने शंका काढिली.

 “होय ना, तापी, याज्ञवल्क्याचं हे उदाहरण तर मला फार पटतं. तान्ह्या मुलाच्या रूपाने आईच्या इवल्याशा आत्म्याला सर्जनशील परमात्म्याचा अनुभव आलेला असतो. तो लहान जीव सर्वस्वी आईवर अवलंबून असतो. आई त्याला खाऊ घालते, वाढविते, रडविते; अशा वेळी सर्वसत्ताधारी सर्वशक्तिमान ईश्वराची भूमिका ती पार पाडीत असते. मुलाच्या खस्ता खाताना, लौकिकात वावरताना तिने स्वत:शी रंगविलेली, समाजमान्य झालेली आईची भूमिका ती पार पाडीत असते. त्या मुलाला बोलायला ती शिकविते, वागायला ती शिकविते, शाबासकी ती देते, शिक्षा ती लावते,- कर्ती-करवती तीच असते. ही भूमिका पार पाडीत असता, तिच्या आत्म्याच्या ह्या आविष्काराचा तिला एवढा कैफ चढतो की, ते मूल हाही एक स्वतंत्र आत्मा आहे, हे ती विसरते. वाढणार्‍या आणि वाढलेल्या मुलाकडून लहानपणच्या असहायतेची,- लगटण्याची, भीतीची, आज्ञा- पालनाची तिची अपेक्षा असते. ती भंगली, म्हणजे तिला अतोनात दुःख होतं. हे वाढलेलं, आपली सत्ता नाकारणारं मूल हेही आपणच आहोत, हे तो विसरते.'

 तापीला माझं प्रवचन पटलेलं दिसलं. “मूल मोठे होण्याची वाटच पहावी लागत नाही, बाई. किती लहानपणापासून त्याचा स्वतंत्रपणा दिसू लागतो. जशा आईच्या अपेक्षा असतात, तशाच मुलाच्याही ठाम अपेक्षा असतात. तेही आपली आई म्हणजे आपल्या 'स्व'चीच पुस्ती म्हणून वागते. मला जर उशीर झाला, तर माझा चार वर्षांचा मुलगा किती रुसतो! त्याचं काही कमी पडलं म्हणून नाही, पण जणू मी त्याच्या काही हक्कावर गदा आणिली, असा त्याचा आविर्भाव असतो.' तिने हसत-हसत सांगितले. आणि उद्याचा वायदा करून ती निघून गेली.

 विद्यार्थिनी गेली, पण माझ्या मनाला एक नवीन करमणूक देऊन गेली. माझी नात खेळता-खेळता पडली. मी आजारी असताही तिला उचलून घ्यायला धावले. माझे मन मला म्हणाले, “ती तूच आहेस" कोवळया चांदण्यासारख्या हसणाऱ्या, वसंताच्या झुळुकीप्रमाणे दुडूदुडू पळणार्‍या माझ्या लहानग्या नातीला माझ्या वाळक्या वृद्ध हातांनी कवळीत हसतच मी म्हटले, “आहेच मुळी मी ती" बाहेर बागेत गेले, तो कुत्रा धावत-धावत