पान:Gangajal cropped.pdf/108

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / ११५


कल्पना नाही. ही परीक्षा किती कठीण आहे ती. बाहेरचे परीक्षक तुझ्या निबंधाबद्दल जे लिहितील, ते तुझ्यापेक्षा मलाच जास्त लागू असतं. माझ्या सुदैवानं ही शोभा फार प्रकटपणे होत नाही! जे विद्यार्थी नापास, त्यांच्याबरोबर मीही नापास; पण जे पास होतात, त्यांच्याबरोबर मी क्वचितच नीटपणे पास होते. ही परीक्षा पास होण्यासाठी माझी धडपड. मी तुझ्यावर रागावते, कधी तुला चुचकारते, तुझं लिखाण नीट व्हावं म्हणून मेहनत घेते, ह तुझ्यासाठी नसून स्वत:साठीच आहे. आयुष्यात मी निरनिराळ्या भूमिका पार पाडीत असते. त्यांतील एक शिक्षकाची. माझ्या मनात मी शिक्षक म्हणून एक स्वत:चं चित्र उभं केलं आहे. प्रत्येक विद्यार्थी हा दुहेरी त-हेने मीच असतो. माझ्या शिक्षणाचं, शिक्षकत्वाचं ते एक प्रतीक असतं. माझ्या विद्यार्थीपणाचं ते दुसरं एक प्रतीक असतं. माझी सर्व धडपड ही माझ्यासाठीच आहे. माझ्यात जे अनंत 'मी' आहेत ना, त्यांतल्या एकेका 'मी' साठी मी जीव टाकीत असते."

 मी थोडा वेळ थांबले. तापी माझं बोलणं ऐकून विचार करीत होती.

 "हे बघ तापी, उपनिषदांत म्हटलं आहे ना ग कुठेसं, 'अरे, तू स्त्रीवर बायको म्हणून प्रेम करीत नाहीस, आपल्या आत्म्यावरचं प्रेम असतं ते. वगैरे?"

 तापीने नुकतीच उपनिषदे वाचली होती. तिचे स्मरणही माझ्या मानाने तल्लख होते. तिने माझ्या कपाटातून बृहदारण्यकोपनिषदातील ते पानच माझ्यापुढे धरिले :

 "न वा अरे पत्यु:कामाय पतिः प्रियो भवति।  आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति।  न वा अरे पुत्राणां कामाय पुत्राः प्रिया भवन्ति।  आत्मनस्तु कामाय पुत्राः प्रिया भवन्ति। ।  न वा अरे देवानां कामाय देवाः प्रिया भवन्ति।  आत्मनस्तु कामाय देवाः प्रिया भवन्ति।  न वा अरे भूतानां कामाय भूताः प्रिया भवन्ति।  आत्मनस्तु कामाय भूताः प्रिया भवन्ति।"

 बघ तापी, याज्ञवल्क्यानं गुरुशिष्याचं निराळं असं उदाहरण दिलं नाही कारण त्याची बायकोच त्याच्यापुढे शिष्या म्हणून बसली होती."

 "आई जे आपल्या मुलावर प्रेम करिते, त्याच्या खस्ता खाते, ते काय