पान:Gangajal cropped.pdf/107

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


चौदा :


'ते सर्व तूच आहेस!'


 "आज पुरे. माझं डोकं चालत नाही. आजचं तपासून झालं तेवढं उद्या नीट करून आण-पुढचं उद्या वाचू"

 "तुम्हांला बरं आहे ना? माझा रोज येण्यानं त्रास नाही ना होत?" तिने काळजीच्या स्वरात विचारिले.

 "छे, छे! तसं काही नाही. पण हल्ली मला पहिल्यासारखं काम होत नाही. माझी प्रकृती पार बिघडायच्या आत संपवून टाक उरलेलं काम, म्हणजे सुटलीस."

 "किती काळजी करता बाई तुम्ही माझी! काम माझं, आणि ओझं तुम्हांला. दुसऱ्यासाठी फार खपता तुम्ही!"

 ती अगदी मनापासून पण विचार न करिता बोलली. मला हसू आलं. तिनं विचारलं, "हसण्यासारखं बोलले मी?"

 "हसण्यासारखंच नाही तर काय? तू म्हणालीस, 'काम माझं आणि ओझं तुम्हांला म्हणून तुला वाटतं, तू माझी विद्यार्थिनी, मी तुझी शिक्षिका -तुझ्यासाठी मी स्वत:ला झिजविते आहे म्हणून-"

 माझे बोलणे पुरे व्हायच्या आत उताविळीने तिने म्हटले, "मग हे खरं नाही का?"

 मी नकारार्थी मान हलविली. "हे पहा तापी, तू विद्यार्थिनी खरी, पण त्याच्या पाठीमागं विशेषण काय लावते मी? माझी विद्यार्थिनी. मी तिला शिकविते. ती पास झाली, म्हणजे तिच्याबरोबरच माझीही परीक्षा पास होते. तू पास होतेस विद्यार्थिनी म्हणून, मी पास होते शिक्षिका म्हणून. तुला