पान:Gangajal cropped.pdf/105

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

११२ | गंगाजल


येईपर्यंत अगदी चिरंतन उघडं सत्यही दिसलं नव्हतं. सत्य कायम, डोळ्यांपुढे उघडं असतं. ते पडद्याआड नसतं. कुठूनतरी उकरून काढायचं नसतं. त्याला न ओळखणं, न पाहणं, पाहूनही दृष्टीआड करणं ही सर्व आपल्या मनाची किमया आहे. वाचायला येऊन उमजत नाही. अनुभव घेऊनही आपण कोरडेच राहतो. कारण सत्य समजून घेण्याची, त्याचा आविष्कार सहन करण्याची मनाची तयारी नसते. मनाच्या तयारीप्रमाणे एकेक कोडी उलगडतात, आणि कितीतरी न उलगडता तशीच राहत असली पाहिजेत. कोडी आहेत, ह्याची जाणीवही आपल्याला न होता आपला अंत होत असेल, हा सगळा विचार संपतो, तो हवं असलेलं वाक्य तैत्तिरीय उपनिषदात सापडलं. तिथं खूण घालून हायडेगर पुढे वाचावयास घेतला..

 व्यक्तीला (तत् ला) नाहीसं होण्याची कायम भीती आहे. पण हायडेगर एवढ्यावरच थांबला नाही. त्याची चिकित्सा पुढे चालू झाली. हे जे तत् असतं, त्याचं आणि त्याच्या असण्याच्या क्रियेतच जे नसण्याचं भय असतं, त्याचं एक रूपांतर ते तत करितं. ते रूपांतर म्हणजे इतरांबद्दल काळजी वा चिंता. व्यक्ती कसल्या-ना-कसल्या काळजीत असते. ती दुसर्‍यांबद्दल काळजीत असते, सगळ्यांची चिंता करीत असते आणि ही दुसऱ्याबद्दल वाटणारी काळजी वा चिंता दुसरं-तिसरं काही नसून स्वतःला स्वतःच्याबद्दल जी चिंता वाटते, तिचं एक रूपांतर आहे. स्वत:च्या नष्ट होण्याची चिंता बाळगीत राहिल्यानं जीवन दुःसह होईल. पण त्या चिंतेला असं रूप दिलं, म्हणजे जीवनौघ व्यवस्थित चालू राहतो, ही हायडेगरच्या विचारावर पडलेली फ्रॉइडची छाया. ह्या दोघांनी मिळून मला माझं खरं रूप दाखविलं. माझ्या प्रकृतीबद्दल विचारणाऱ्या माणसाला हसून उलट, “आता तुमची प्रकृती कशी आहे? मध्ये फार आजारी होता, नाही?" असं काळजीच्या सुरात विचारणारी मानभावी मी, “अग, तुला हल्ली बरं नसतं. एवढी बडबड करू नकोस; घरी बसून विश्रांती घे" असं कर्त्यासवरत्या शहाण्यासुरत्या मुलीला बजावणारी मी, “हे बघ धाकटीला पडसं झालं आहे. तिच्या अंगात गरम घाल. तिला बाहेर नेऊ नकोस. भारी काळजी वाटते बाई तिची." असा उपदेश करणारी मी, म्हणजे स्वत:च्या भयानं वळवळणारा वरवर दुसऱ्याबद्दलच्या काळजीचा बुरखा घेतलेला माझाच क्षुद्र जीव आहे हे स्पष्ट झालं.