पान:Gangajal cropped.pdf/104

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गंगाजल / १११

 असतची दाट छाया जन्मापासूनच पडलेली असते व ‘निष्ट-झाइन’ ‘नाहीसं होणं' ह्या परिणामाचं भय त्याला असतं. हे भय तत् चं एक लक्षण आहे. इथपर्यंत आले आणि डोळ्यांपुढे पुस्तकातलं पान व ओळ स्वच्छ दिसली. 'आनन्दं ब्रह्मणो विद्वान न बिभेति कदाचन।' भय कसलं असतं व कशामुळे ते नाहीसं होतं, हे अगदी लख्ख समजलं. हायडेगर तिथंच सोडला व पाचवीच्या पुस्तकातलं वाक्य परत सापडतं का, बघू लागले.

 हात व डोळे पुस्तकं चाळीत होते आणि मन भरकटत होतं. ह्या ओळीचा अर्थ इतका सोपा आहे की, त्याला म्हातारपण का यावं लागलं? वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षी कळलं नाही, तर नवल नाही, पण मागून विशीच्या पुढे सुद्धा मन प्रगल्भ झालं नव्हतं का? लहानपणी मूत्यूची कल्पना नसते. पुढे जीव व मृत्यू ह्या दोन शब्दांची सांगड घातलेली वाक्यं वाचली, तरी 'भय' शब्द नसल्यामुळे साखळी जुळली नाही. पंचमहाभय- सप्तमहाभयांची चित्रं पाहिली, पण त्यांत निरनिराळ्या एकेका भयाचं, पाण्यात बुडून मरण्याचं, आगीत जळण्याचं वगैरे चित्रण असल्यामुळे 'भया' च्या सर्वंकष सामान्यत्वाची कल्पना आली नाही. ज्ञानदेवांच्या ओळींतही 'जन्म' आणि 'मृत्यू' असे शब्द आहेत; ‘भय' नाही. म्हणून लक्षात आलं नाही. अशी सारवासारव मी करू बघत होते. पण एकदा जागं झालेलं मन ही तडजोड मानायला तयार नव्हतं. परत पहिल्यापासून विचार करायला लागले.

 लहानपणी मृत्यूची कल्पनाच नसते. त्यामुळे ही ओळ समजण्याचं सामर्थ्यच मनाला नव्हतं. इथपर्यंतचं समर्थन पटण्यासारखं होतं. मोठेपणी क्षणभर थांबून उसंत घेतली असती, विचार केला असता, तर ओळ समजली असती. पण मन व शरीर वर्तमानकाळात इतक्या आस्थेनं वावरत होतं, इतक्या उत्कटतेनं प्रत्येक क्षण जगत होतं की, अव्यक्त अशी सुरुवात (अव्यक्तादि) व अव्यक्त असा अंत (अव्यक्तनिधन) ह्यांकडे त्याची झेपच नव्हती. व्यक्तमध्यात ते पूर्णपणे गुरफटलेलं होतं. तेही दिवस गेले. सासर- माहेरची वडील माणसं गेली. ज्यांना जिवाभावाचे मित्र म्हणत असे, त्यातलेही काही गेले. पण मन अजून पुरं जागं झालं नव्हतं. स्वत:ची जिवावरची दुखणी आली. म्हातारपण व अशक्तपणा आला. तेव्हा जिथं जातो तिथं बरोबर असणार्‍या ह्या सांगातीची ह्या ‘निष्ट-झाइन'च्या अस्तित्वाची जाणीव झाली. भयानं मनाला स्पर्श केला. हा सर्व अनुभव