पान:Gangajal cropped.pdf/103

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

११० / गंगाजल

 एकदा जुन्या इंग्रजी पाचवीच्या वर्गात संस्कृताचा धडा चालला होता. पुस्तक होतं भांडारकरांचं दुसरं पुस्तक. पुस्तकात एक वाक्य भाषांतरासाठी होतं. 'आनन्दं ब्रह्मणो विद्वान न बिभेति कदाचन।' अर्थ लावायची माझी पाळी होती. 'भी' धातूच्या तृतीय-पुरुषाच्या रूपासाठी वाक्य घातलं, हे उघड होतं. वाक्य सोपं होतं. सर्व शब्द व त्यांची रूपं मला माहीत होती. मी अर्थ केला, “ब्रह्माचा आनंद माहीत असणारा कधीही भीत नाही." अर्थ बरोबर होता. मी खाली बसले. शब्दांचा अर्थ लागला होता. पण वाक्याचा अर्थ मला मुळीच कळला नव्हता. ब्रह्माचा आनंद आणि भीती ह्याचा संबंध काय? मनात म्हटलं, “मला कुठं भीती वाटते आहे? पण मला कुठं ब्रह्माचा आनंद होतो आहे? हे भांडारकर विचित्रच वाक्यं घालतात."

 काही दिवस वाक्य मनात घोळलं व नंतर कित्येक तपं मी ते वाक्य विसरूनही गेले होते. बी. ए. च्या वर्गात म्हणे मी तत्त्वज्ञान हा विषय घेतला होता; पण सबंध दोन वर्षांत त्या वाक्याची मला आठवण झाली नाही. कधी तरी अजिंठ्याची लेणी पहायला मी गेले होते. तिथे मनुष्याला ‘पंचमहाभय की ‘सप्तमहाभयं' असतात, त्यांचे चित्रण केलेलं पाहिलं. एवढंच काय 'मृत्यू उदराचिये परिवरौं।गर्भ गिंवसी' ही ज्ञानदेवीतली ओवीपण मोठा रस घेऊन वाचली. पण मन काही केल्या ह्या अनुभूतीचा भांडारकरांच्या पुस्तकात वाक्याशी संदर्भ जोडीना. पण एक दिवस उजाडला. हायडेगरचे एक भाषांतरित पुस्तक वाचीत होते. विषय त्याचा आवडता. झाइन (Sein) आणि निष्ट-झाइन (Nichtsein). ‘झाइन' म्हणजे असणे, ‘निष्ट-झाइन' म्हणजे नसणं. त्यानं ज्यावर भाष्य केलं आहे अशी आणखी एक कल्पना ‘डाझाइन' (Dasein) म्हणून आहे. ‘डाझाईन' म्हणजे 'तिथं असणं, असणारं', संस्कृतात नैयायिकांच्या भाषेत सांगावयाचे, म्हणजे 'तत‘ झाइन-नेस' (Sein-ness)- असणेपण, म्हणजे सत्ता; ‘निष्ट-झाइन-नेस- (Nicht-sein-ness)- विशिष्ट ठिकाणी नसणेपणा म्हणजे असत; व ‘डाझाइन-नेस' (Dasein-ness)- विशिष्ट ठिकाणी असणं, म्हणजे 'तत्ता'- ‘डाझाईन' हे ‘दिक व काल यांनी मर्यादेत आणलेलं' - ‘अभिव्यक्त झालेलं झाईन' किंवा 'व्यक्ती'. हायडेगर सत् ची त्यापेक्षाही तत् ची चिकित्सा करिताना व रूप निश्चित करिताना त्याचे मुख्य गुण काय, हे सांगतो. 'सत' हे सर्वव्यापी व अनंत असल्यामुळे असत ला गुंडाळून बसलेलं असतं. पण ‘तत्' हे सत् चे देशकालानं मर्यादित झालेलं रूप असल्यामुळे त्यावर