पान:Gangajal cropped.pdf/101

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१०८ / गंगाजल


'आज्ञा', 'सांगावा', 'आयुक्ती'. 'तुझा नियोग' म्हणजे 'तुझी आज्ञा',

'तुझं सांगणं' असा अर्थ होतो. 'ह्या तुझ्या सांगण्यामुळे मी कोण, हे उमजलं; आता मी आनंदानं लढाईत मरेन, कारण मी क्षत्रिय असल्यामुळे या क्षत्रियोचित मरणानं मी स्वर्ग साधीन,' असं कर्णाचं म्हणणं सरळ दिसतं. त्यात घोटाळा काही नाही. 'नियोग' हा शब्द व नियुज ह्या धातूची रूपे माझ्याही परिचयाची होती. 'तक्तिं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव' ही ओळ कितीदा तरी वाचनात आली होती. 'नियोग- ‘सांगितलेली आज्ञा' हा अर्थही कित्येक वाक्यांत आलेला होता. पण महाभारताच्या परत-परत केलेल्या वाचनानं व त्यातील राण्यांच्या 'नियोगा'नं माझं मन इतकं व्यग्र झालेलं होतं की, साधा-सरळ अर्थही मला सुचेनासा झाला होता. तो उलगडा एका विद्वान व व्यग्र नसलेल्या लख्ख मनानं केला.

 देवळातले शिल्प, धातूच्या मूर्ती, मध्ययुगापासून काढलेली चित्रं ह्यांतल्या बऱ्याचशा कलाकृतींत मनुष्यदेह वस्त्राच्छादित असूनही देहाकृती स्पष्टपणे दर्शविलेली आहे. वस्त्राच्या चुण्या, खांद्यावरून व पोटावरून लपेटलेले वस्त्र यांचा आकारही स्वच्छ दाखवून त्यांच्या आडचे अवयवही स्पष्ट दाखविलेले आहेत. मला वाटायचं, हा एक संकेत आहे म्हणून. वस्त्राचं सौंदर्य व मनुष्यदेहाचं सौंदर्य ही दोन्ही दाखविण्याचा मोह कलाकाराला आवरला नाही व त्यातून वस्त्रही दाखवायचं व त्याच्या मागची देहाची आकृतीही दाखवावयाची, असा संकेत पडला असावा, अशी माझी ठाम समजूत होती. एक दिवस माझा हा भ्रम नाहीसा झाला. ओरिसात जाजपुर रोड स्टेशनवरच्या प्रतीक्षालयात सकाळच्या वेळी मी बसले होते. मी बसलेली खोली सावलीची होती. खिडक्या पश्चिमेकडे होत्या. पुढे पूर्वेला प्लॅटफॉर्म व त्याच बाजूला दार होतं. सूर्याचे किरण दारातून खोलीच्या मध्यापर्यंत आले होते. मी सहप्रवाशांकडे पाहत होते. अधूनमधून प्लॅटफॉर्मवर दृष्टी टाकीत होते; मधून-मधून घड्याळाकडे बघत बसले होते. इतक्यात एक वयस्क विधवा बाई आपल्या नातवाचा हात धरून दाराशी आली. ती आत येण्याच्या आतच तिला दुसरी कोणी मुलं भेटली, व ती त्यांच्याशी बोलत दारातच उभी राहिली. बाई उघड-उघड जुन्या वळणाची होती. तिच्या अंगात चोळीपोलकं काही नव्हतं. त्याचप्रमाणे नेसल्या साडीच्या खाली हल्लीच्या मुली घालतात, तसा परकर नव्हता. तिचं नेसणंपण जुन्या त-हेच्या उडिया बाईचं. पांढऱ्या शुभ्र साडीचा एक एकेरी