पान:E-Book 100 Common Birds in Maharashtra Marathi (2).pdf/83

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्रातील १०० सामान्य पक्षी
डॉ. राजू कसंबे : 2015


डोंबारी चंडोल
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: डोंबारी चंडोल.

इंग्रजी नाव: Ashy-crowned Sparrow-lark (Ashy-crowned Finch-lark). शास्त्रीय नाव: Eremopteryx griseus. लांबी: १३ सेंमी. आकार: चिमणीपेक्षा छोटा. ओळख: वरील बाजूस मातकट-तपकिरी, बसका चंडोल. चोच जाड, तुरा नाही. मुकुट राखाडी. डोळ्यामधून जाणारी काळी पट्टी. चोचीपासून बुडापर्यंत खालील बाजू काळी. दिसायला एकंदरीत नर चिमण्यासारखा तर मादी चिमणी सारखी. आवाज: विणीच्या हंगामात सुंदर हवाई कसरती करीत बासरीसारखे शेवटी लांब ‘व्हीची' ने संपणारे स्वर आळवतो. सुरुवातीला तीसेक मीटर उंची गाठून पंख बंद करून खाली झेपावतो, मध्येच पंख पसरवून फडफडत आणखी थोडी उंची गाठतो. पुन्हा झेप, पुन्हा उंची असे दोनतीनदा झाल्यावर एखाद्या उंचवट्यावर वा खडकावर विसावतो. व्याप्ती: रहिवासी. सह्याद्री सोडून संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: पडीक शेतजमिनी, खुले झुडूपी प्रदेश, निम्न-वाळवंटी प्रदेश, खुली खडकाळ माळराने. खाद्य: रानटी वनस्पती तसेच गवताच्या बिया. कीटक.

८३