पान:E-Book 100 Common Birds in Maharashtra Marathi (2).pdf/14

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्रातील १०० सामान्य पक्षी
डॉ. राजू कसंबे : 2015मोराच्या पिसांची फार मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होते. हिंदी महासागरातील बेटांवर घरटी करणाऱ्या पाकोळ्यांच्या (Edible Nest Swiftlet) घरट्यापासून सूप तयार करतात. ह्या सूपला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खूप मागणी आहे. या पाकोळीची पिल्लं मोठी होऊन उडून गेल्यानंतर रिकामी झालेली घरटी काढून घेतली जातात.

पक्ष्यांच्या विष्ठेपासून उच्चप्रतीचे खत तयार होते. विशेषतः ज्या ठिकाणी हजारो पक्ष्यांच्या सामुहिक वीण वसाहती (जसे करकोचे, पाणकावळे आदींचे सारंगागार) आहेत त्या ठिकाणी विष्ठा जमवून विकल्या जाते.

पक्षी पर्यटन (बर्ड टुरिझम): वन संवर्धनाचा नवा मंत्र

पक्षी निरीक्षणाचा छंद जगात झपाट्याने वाढत असून केवळ पक्षी बघण्यासाठी, पक्ष्यांचे छायाचित्रण करण्यासाठी तसेच संशोधनासाठी प्रवासाला निघणाऱ्यांची संख्या आता प्रचंड वाढली आहे. त्यासोबतच पक्षी व रानवाटा दाखविणारे स्थानिक वाटाडे, पक्षीतज्ञ, महत्त्वाच्या ठिकाणी राहण्याची सुविधा, खानपानाची सुविधा ह्या सर्व गोष्टींची गरज निर्माण झाली. त्यासोबतच संपूर्ण जगातच पक्षी पर्यटनाची लहर आलेली आहे. आपल्या देशात असलेल्या प्रचंड पक्षी वैविध्यामुळे देशांतर्गत तसेच विदेशातील आंतरराष्ट्रीय पक्षी प्रेमी पर्यटनाला येत असून त्याद्वारा हजारो रोजगार उपलब्ध झाले आहेत. पक्षी पर्यटनाला चालना मिळाल्यामुळे स्थानिक लोकांचा वन वनसंवर्धनाला जोरकस पाठींबा मिळविणे सोपे झाले आहे. पक्ष्यांना मारुन खाण्यापेक्षा जंगल (व त्यातील पक्षी) वाचवून आपल्याला जास्त व अखंड आर्थिक उत्पन्न मिळू शकते याची जाणीव आता लोकांना होऊ लागली आहे. त्यामुळे अतिशय दुर्गम भागात सुध्दा वन-व्यवस्थापन समित्या स्थापन होऊन स्थानिक लोकच वन संवर्धनाचे काम करू लागले आहेत.

१४