पान:E-Book 100 Common Birds in Maharashtra Marathi (2).pdf/13

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्रातील १०० सामान्य पक्षी
डॉ. राजू कसंबे : 2015



निसर्गाचे सफाई कामगार

गिधाडे, घारी व कावळे निसर्गाचे सफाई कामगार होत. गावकुसाबाहेर फेकलेले मृत जनावर गिधाडे काही तासात फस्त करून टाकत. उकीरड्यावरचे इतर खरकटे अन्नपदार्थ संपवायचे कार्य घारी, कावळे करतात. गिधाडांची संख्या रोडावल्या मुळे बगळे, साळुंक्या, पारवे (कबुतर), एवढेच नव्हे तर चिमण्यासुद्धा उकिरड्यावर दिसायला लागल्या आहेत. पक्षी नसते तर अशा उकीरड्या द्वारा व मृत जनावरांद्वारा अनेक संसर्गजन्य रोग पसरू शकतात.

फुलांचे परागीभवन

फुलांमधील मधुरस चाखणारे विविध प्रजातीचे पक्षी फुलांना भेटी देत फिरत असतात. पक्षी मधुरस चाखत असतात तेव्हा फुलातील परागकण त्यांच्या चोचीला, कंठाला अथवा मानेला चिकटून दुस-या फुलापर्यंत पोचतात. अशा प्रकारे फुलांचे पर-परागीभवन (Cross-pollination) घडते. पर-परागीभवनामुळे निसर्गात गोड पक्व फळं तर तयार होतातच तसेच वनस्पतींच्या नवीन प्रजातींची उत्क्रांती सुध्दा होते. पक्षी आणि फुलांचे निसर्गात फार महत्त्वाचे संबंध असून त्यांनी एकमेकांसाठी स्वतःला उत्क्रांत करून घेतले आहे, जसे फुले जास्त भडक झाली व पक्ष्यांच्या चोची बाकदार व धारदार झाल्या.

बीजप्रसारक

अनेक प्रकारची फळे खाल्ल्यानंतर फळांचे बीज पक्ष्यांच्या विष्ठेद्वारे दूरपर्यंत जाऊन पडते. काही झाडांच्या बीजाला जाड कवच असते. ते कवच केवळ पक्ष्यांच्या पोटात विरघळते व नंतरच ते बीज उगवते, अन्यथा नाही. वड, पिंपळ, उंबर आदी झाडांची बीजे पक्ष्यांच्या पचनक्रियेतून गेल्याशिवाय रुजत नाहीत. बुलबुल, कोकीळ, धनेश (Hornbil), तांबट, हळद्या, मैना इ. अनेक प्रजातीचे फलाहारी पक्षी बीज प्रसाराचे काम करतात. असे म्हणतात की फलाहारी पक्षी ‘वनीकरणाचे' काम करतात. फलाहारी पक्ष्यांमुळेच घाणेरी सारख्या वनस्पतीचा जगभर प्रसार झालाय.

पक्ष्यांपासूनची उत्पादने

पूर्वी भारतात बगळ्यांच्या पंखाचा फार मोठा व्यापार होत असे. स्त्रियांच्या विविध प्रकारच्या टोप्या तसेच वस्त्रप्रावारणांमध्ये या पिसांचा उपयोग होत असे. अजूनही आपल्या देशात

१३