पान:E-Book 100 Common Birds in Maharashtra Marathi (2).pdf/11

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्रातील १०० सामान्य पक्षी
डॉ. राजू कसंबे : 2015पिढीपर्यंत पोचवतात. काही जण संशोधन पत्रिकांमध्ये लिखाण करतात अथवा अगदीच थोड़के लोक पुस्तक लिहितात. आपल्या नोंदींचा समाजाला, पुढील पिढीला उपयोग करू द्यावयाचा असेल तर ह्या सर्व नोंदी इंटरनेट वरील ई-बर्ड सारख्या वेबसाईटवर टाकाव्यात. पुढे चालून ह्या नोंदींचा अभ्यास करून, पक्ष्यांच्या संख्येत होत असलेले बदल तसेच पर्यावरण बदलाचे पक्ष्यांवर होणारे परिणाम आपल्याला वा पुढील पिढीला जाणून घेता येतील अन्यथा आपली निरीक्षणे समाजाच्या उपयोगी पडणार नाहीत.

चांगले पक्षीनिरीक्षक होऊ या

आपण पक्षीनिरीक्षणाला जाताना एक चांगले पक्षी निरीक्षक व्हायचा प्रयत्न करू या. राखीव जंगल अथवा अभयारण्यात जात असल्यास रीतसर परवानगी घ्या. प्रवेश शुल्क तसेच कॅमेरा शुल्क भरा. त्यामुळे त्या स्थळाच्या संवर्धनात आपला हातभार लागतो.

पक्षी निरीक्षण करताना गोंगाट, आरडाओरडा करू नका. त्यामळे पक्षी घाबरून उडून जातात. एखादा पक्षी तुम्हाला दिसल्यास इतरांना ओरडून सांगण्याऐवजी इशाराने अथवा शिळ घालून सांगा. शक्यतो उपलब्ध असलेल्या पायवाटेचा उपयोग करा. वाहने पक्ष्यांच्या अधिवासात घुसवून पक्ष्यांचा अधिवास नष्ट करू नका. अनेक पक्षी जमिनीवर घरटी करतात हे लक्षात असू द्या. तेथे प्लास्टिकच्या पेशव्या, बाटल्या फेकू नका (परत येताना दुसऱ्यांनी फेकलेल्या अशा वस्तू आढळल्यास उचलून आणल्यास अति-उत्तम).

एखाद्या पक्ष्याचे घरटे आढळल्यास त्याची छायाचित्रे काढण्याचा अट्टाहास करू नका. घरटी, अंडी तसेच असहाय पिल्लांच्या छायाचित्रांना आता कुठल्याही स्पर्धेत, प्रदर्शनात प्रवेश निषिद्ध आहे. पक्ष्यांच्या घरट्याला, अंडी अथवा पिल्लांना हात लाऊ नका. पक्ष्यांची घरटी काढून आणू नका. ज्या पक्ष्यांवर आपण प्रेम करतो त्यांची वंशवृध्दी झाली तरच ते जगतील. जंगलात शिकार अथवा अवैध वृक्षतोड़ होत असल्याचे तसेच वणवा लावलेला आढळून आल्यास वन विभागाला कळवावे.

एक सच्चा पक्षी निरीक्षक आणि निसर्ग प्रेमी म्हणूनच आपण जंगलात जाऊ या आणि पक्षी निरीक्षणाचा तसेच वनभ्रमणाचा आनंद घेऊ या !

११