पान:Bhovara-Iravati Karve.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०

       किती घेशिल दो कराने

 दिल्लीला पोचल्यापासून उन्हाच्या जोडीला धुळीच्या वादळालाही सुरुवात झाली होती. भर दुपारीसुद्धा सूर्य दिसत नव्हता. चमत्कारिक पांढुरका उजेड होता; पण फार लांबवरचे काही दिसत नव्हते. राजपूरला प्रत्यक्ष वादळ नव्हते, पण अंतराळातली धूळ काही कमी झाली नव्हती; व उष्णता तर वाढलीच होती. डोळे उघडे ठेवले तरी दुखत होते. बंद केले तरी दुखत होते. दोन दिवस त्या तशा उन्हात हिंडून हिंडून अगदी दमून गेले होते, पण कुलूला जायला तर पाहिजेच होते. पुण्यापासून पत्रे व तारा गेल्या होत्या. लोक उगीच वाट पाहात बसायचे. अगदी अनिच्छेने रात्रीची गाडी पकडली व धगधगत्या डब्यात बसून पहाटेची पठाणकोटला पोचले.
 स्टेशनवर कुणीच आले नव्हते. काय करावे बरे? तोंड धुऊन थोडे खाऊन घ्यावे; तोवर कुणीतरी येईल- निदान एखादी जीप व ड्रायव्हर तरी येईल, असा विचार केला. पण अर्ध्या-पाऊण तासाने पाहिले तरी कोणी नव्हते. आता काय करावे बरे? इतक्या लांब आले, तशी बसने कुलूला | जावे व काम आटपून टाकावे, म्हणून बसचे तिकीट काढायला गेले. “छे, कुलूला जाणारी बस कधीच गेली. आता बस मंडीपर्यंत जाईल. कदाचित तेथून कुलूची बस मिळेल'... तरीच बरं का, प्रवासी गाडीतून उतरून धावत सुटले होते मघाशी! काश्मीर व कुलू लांब पल्लयावर म्हणून पहिली बस पकडण्याची धडपड असणार त्यांची. मी मात्र जीपवर विसंबून राहिले. "विचार कसला करता? दुसरी गाड़ी पण भरत आली आहे.” मी भानावर आले. तिकीट काढले. सामान चढवले व आत बसले तो गाडी सुरू झाली. मनातल्या मनात मी रागावले होते- गोंधळलेही होते. महिन्यापूर्वीपासून