पान:Bhovara-Iravati Karve.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



भोवरा / ९७

नाही. तेच तेच मुद्दे परत सांगतात." एका माणसाची आयुष्याची कमाई किती असणार? ती कमाई करताना अनुभूतीचा प्रवाह तुडुंब भरून चालला की मनुष्य आपण होऊन दुसऱ्याला बोलावते व आपली कमाई वाटीत सुटते. पण त्याला ओहोटी लागणारच. परत नव्याने भरायला थोडी उसंत नको का? मी एक क्षुद्र माणूस. इतरांसारखी मीसुद्धा माझ्या क्षुद्र संसारात, वेड्याबागड्या मुलांत रमलेली आहे; माझ्या कामात गढलेली आहे. अशी वेळ येते की माझी अनुभूती मला सांगावीशी वाटते; अशी वेळ येते की माझ्या कामात काही नवे सापडल्यासारखे वाटते व मग मी कोणी न बोलावता सांगते व लिहिते. ते करून झाले की मजजवळ काही राहात नाही. मग मी बोलले तर ते रिकाम्या गाडग्यात दगडाच्या खुळखुळण्यापेक्षा जास्त किंमतीचे नसते. सभांतून बोलावयाचे तरी काय? पुढे बसलेला समाज एकजिनसी नसतो. काही अशिक्षित, काही अर्धशिक्षित, काही सुशिक्षित. वये चौदा-पंधरापासून तो पंचाहत्तरापर्यंत. कोठच्याही विषयावर परिश्रमपूर्वक बोलणे कसे शक्य होणार? मी उठले आणि असला समाज पुढे पाहिला की माझे हातपाय गळतात. असल्या बोलण्याने कोणाला काही बोध व आनंद होत असेल का?"
 बाहेरचे दार वाजले म्हणून मी पाहिले तो तीन-चार माणसे फाटक उघडून अंगणात येत होती. “अरे देवा!' मी म्हटले. मुलगा तिथेच वाचीत बसला होता. “तू नको पुढे होऊस. सकाळसारखा प्रकार होईल. मी लावतो त्यांना वाटेला त्याने होकाराची वाट न पाहता दार उघडले व तो सोप्यात गेला. खोलीत पडल्यापडल्या मला बाहेरचे संभाषण ऐकू येत होते.
 “कोण पाहिजे आपल्याला? कोण आपण?"
 “आम्ही अमक्या गावचे. मी आमच्या गावच्या व्याख्यानमालेचा चिटणीस. हे दुय्यम चिटणीस, हे खजिनदार, हे उपाध्यक्ष- चौघे आलोत.म्हटलं, तिघांनी जाऊन कार्यभाग होणार नाही.” गृहस्थ आपल्यावर खूष होऊन हसले. “बाईंना पुष्प गुंफण्याची विनंती करण्यास आलो आहो. सेकंड क्लासचं भाडं देऊ. सकाळच्या गाडीनं निघायचं. मुंबईला किंवा दादरला गाडी बदलायची, की एका तासात स्टेशन येईल. आम्ही स्टेशनवर न्यावयास येऊ. मग एका तासाचा मोटारीचा प्रवास की-"
 “अहो, पण..."