पान:Bhovara-Iravati Karve.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



भोवर / ९५

तुम्हांला पाठवलेल्या पत्राचं उत्तर आलं नाही; समक्षच भेटावं म्हणून काल संध्याकाळच्या गाडीनं आले."
 मी जरा आश्चर्याने म्हटले, “अहो; तुम्हांला पत्र पाठवल्याला तीन दिवस झाले. तुमच्या गावी पुण्याहून तर दुसऱ्याच दिवशी पत्र जातं."
 “छे बाई, मिळालं नाही. मी अगदी रोज वाट पहात होते. मग काय उत्तर दिलं?"
 “मला येता येणार नाही. इथंच माझी ढीगभर कामं साचलीत” मी तुटकपणे म्हटले.
 "मला नव्हतीच आशा! सगळ्यांनी विनवून सांगितलं की तुम्हांला आण. मी म्हटलं, त्या कशाला आपल्या लहानशा गावात येतात! शहर म्हणायचं, पण खरं म्हणजे पुण्याच्या मानानं खेडंच. तर मी येते. त्या अमक्याचं घरी किती दूर आहे हो? कसं जायचं ते सांगा. पुण्याची इकडली वस्ती मला माहीत नाही. जरा कुठल्या रस्त्यानं जायचं ते सांगा, म्हणजे मी जाईन.”
 माझे पत्र पोचले नाही, म्हणून त्या बाईला इतक्या लांब यावे लागले. इकडे वाहन मिळायची पण पंचाईत. बाई दमल्यासारखी दिसत होती. मला माझ्या तुटकपणाची लाज वाटली. मी मवाळ आवाजात म्हणाले, “वीसपंचवीस मिनिटं थांबलात तर बस येईल. तुम्हांला जिकडे जायचं त्याच रस्त्यानं जाईल. जरा बसा, चहा करते."
 “छे ! चहा नको. तेवढं तुम्ही हो म्हटल असतंत म्हणजे माझे सारे श्रम हरले असते. पण तुम्हांला आग्रह करायचा तरी जिवावर येतं. तुम्ही कामाची माणसं, सगळी शिकलेली. आमचा समाज आपला खेडवळ. दुसऱ्या कुणाचं नाव सांगा; नाहीतर चिठ्ठी द्या, म्हणजे तिकडं जाईन."
 सांगायचे तात्पर्य काय, बस यायच्या आत मी व्याख्याने द्यायचे कबूल केले; शनिवारी सकाळच्या गाडीने जायचे, रविवारी रात्रीच्या गाडीने परत आले, की सोमवारी कॉलेजला हजर राहता येईल वगैरे. ती बाई गेली, आणि मी कशी हा हा म्हणता बळी पडले, त्याची जाणीव होऊन मी कपाळावर हात मारून घेतला! तेवढ्यात मुलगा बसण्याच्या खोलीत आला. "शेवटी पाघळलीस ना?" त्याने कुचेष्टेने विचारले. माझा दु:ख व राग शब्दांपलीकडे होते. मी फक्त मान हालवली. मला माझा स्वतःचा राग आला