पान:Bhovara-Iravati Karve.pdf/93

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९३ / भोवरा

जाहिरात तिने माझ्यापुढे टाकली. तिची जाहिरात व त्या सेक्रेटरीचे छापील पत्रक ही दोन्ही इतकी सारखी होती, की वाचून तिच्या हातात जाहिरात देण्याऐवजी मी ते पत्रकच दिले!
 "हे काय भलतंच दिलंस? माझी जाहिरात दे परत, व तुझं पत्र घे तुला!" मी जरा आश्चर्याने ते पत्रक हातात घेतले व परत त्यावर नजर टाकली. नुसते आकार-साम्यच नव्हे तर सर्वच दृष्टींनी ते पत्रक म्हणजे सर्कसची जाहिरात होती. तो सेक्रेटरी निरनिराळ्या जनावरांना प्रेक्षकांपुढे नाचवीत होता. बंगालचा पट्टया वाघ, गीरच्या रानातले सिंह व सह्याद्रीच्या जंगलातली हरणे एका रिंगणात उभी होती- छे! वाचायला चुकले. पुण्याचे महामहोपाध्याय द. वा. पोतदार, मुंबईचे अनंत काणेकर व नागपूरच्या कुसुमावतीबाई देशपांडे एका व्यासपीठावरून, पण एकामागून एक त्या व्याख्यानमालेत व्याख्याने देऊन गेले होते. आता माझा खेळ व्हावा, अशी प्रेक्षकांची मनीषा होती व रिंगमास्तर मला पिंजऱ्यातून बाहेर येण्यास फर्मावीत होते. फडाडू! चाबकाचा आवाज ऐकू येऊन माझे अंग शहारले. मी डोळे चोळून भोवताली पाहिले. अजून तरी मी घरीच होते. मी ह्या सर्कशीत जाणार नाही. ही लिहिणारी सगळी माणसे साक्षर होती, “माझे विचार तुम्हांला ऐकायचे आहेत ना? मग मी मोठ्या परिश्रमाने लिहिते ते लेख व पुस्तके का नाही तुम्ही वाचीत? मला काय येत आहे ते सर्व त्यांत आहे. त्याबाहेरचं मजजवळ काही नाही. मुलांना गोष्टी सांगा की. घरातली मुले पुरेशी वाटत नसली तर आळीतली गोळा करा. कितीतरी आपोआप तुम्हांला दुवा देतील. घरगुती गोष्टींना जागतिक रूप देऊन त्याची जाहिरात कशाला? शाळेतल्या वर्गावर्गाची संमेलने करायची असल्यास खुशाल करा. शिक्षक व विद्यार्थी एकत्र जमा. खा, प्या, हसण्याखेळण्यात एक दिवस घालवा; पण त्याचा समारंभ करून त्याचा साक्षी म्हणून परक्याला का बोलावता? संक्रांतीच्या हळदी-कुंकवालासुद्धा अर्घ्य लागू लागले. नशीब माझे की लग्नसमारंभ अजून अमक्या तमक्याच्या अध्यक्षतेखाली नाही होऊ लागले!"
 “अग तू व्याख्यान कसलं देते आहेस आणि चिडली का आहेस? लिहून टाक सगळ्यांना, वेळ नाही म्हणून."
 मी मोठमोठ्याने बोलत होते हे माझ्या ध्यानातच नव्हते. मी गप्प