पान:Bhovara-Iravati Karve.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९२ / भोवरा

मला जागे व्हावेच लागेल. “तो पत्रांचा ढीग पाहिलास का? आज नाही चाळलास तरी उद्या मात्र पाहवा लागले" ह्या बोलण्याने मी दचकले. ह्या गावाहून त्या गावाला अशी मी भटकत होते, म्हणून सर्व डाक इथेच अडकून राहिली होती. पत्रांचा ढीग पडला होता. काही थोडी नातेवाईकाचा व मित्र मंडळींची होती. ती घरी सर्वांची वाचून झाली होती. मी तो वाचतावाचता आतील मजकूर व पाठवणारी व्यक्ती ह्यांबद्दल घरगुती गप्पा झाल्या. नंतर दुसरा ढीग समारंभाच्या र्नित्रणांचा होता. सुदैवाने सर्व समारंभ मी पुण्यास पोचायच्या आत उरकलेले होते. मी एक श्वास टाकून तो ढीग सबंधच्या सबंध उचलून टोपलीत टाकला व उरलेल्या पत्रांकडे वळले.
 “उद्या तरी वेळ कसा मिळणार ? सकाळी दोन तास गणेशखिंडावर शिकवणे, परत येऊन घाईघाईने जेवून कॉलेजात जायचे, तिथे अकरा ते पाचची हजेरी. पंधरा दिवसांच्या गैरहजेरीमुळे कितीतरी विद्यार्थी वाट पाहात असणार. शिवाय तिकडे काही पत्रव्यवहार पाहावा लागणार संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास एकदा आईकडे जाऊन भेटून यायचे आहे. एकदा रोजचे चक्र सुरू झाले म्हणजे वेळ कुठचा? आठवडय दोन तास शिकवायचे, तर सातआठ तास वाचन व अभ्यास करावा लागतो मला अजून!"
 मी पत्रे पाहू लागले. “आमच्या गावी आम्ही अमकी व्याख्यानमाला योजिली आहे. आपण एक पुष्प गुंफावे" हाच मजकूर निरनिराळ्या प्रकाराने आलेला होता. कोणी मुलांना गोष्टी सांगण्याचा उपक्रम सुरू केला होता. “तुम्ही येऊन आमच्या मुलांना गोष्टी सांगा" कोणी लिहिले होते. "अमक्या गावात अमके भगिनीमंडळ आहे. त्याच्या हळदीकुंकूप्रसंगी व्याख्यान द्यावे” “अमक्या पेठेत शाळेच्या पाचवी-सहावी-सातवीचा वार्षिक उत्सव आहे, तुम्ही मुख्य पाहुण्या म्हणून यावे व चार शब्द सांगावेत” एका विशेष तडफदार सेक्रेटरीने नुसते आमंत्रण दिले नव्हते, तर त्याबरोबर आतापर्यंत कोणकोणते लोक येऊन कशाकशावर बोलून गेले त्याची ठळक अक्षरात यादी दिली होती.
 मी पत्रे पाहात होते तो धाकटी आली. “आपण येत्या शनिवारी सर्कसला जाऊ. बघ, किती छान सर्कस आहे ती!" सर्कशीची एक