पान:Bhovara-Iravati Karve.pdf/90

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९० / भोवरा

आठवण झाली. इस्त्राएलच्या सरकारने शेती, बागाईत व लहानलहान राखीव जंगले करायचा निश्चय केला आहे; आणि त्या प्रयत्नांना मदत म्हणून इस्त्रायलच्या राज्यामध्ये शेळी हे जनावर पाळण्याची बंदी आहे; शास्त्रज्ञांचे असे मत आहे की, पोर्तुगाल, स्पेन, सिसिली, माल्टा, भूमध्य समुद्रातली इतर बेटे व ग्रीसचा बराच भाग हे वैराण होण्याचे मुख्य कारण म्हणजे शेळी होय; अर्थात् शेळीच्या मदतीला अरबस्थानात वर सांगितलेल्या इतरही गोष्टी होत्या.

 समुद्राच्या किनाऱ्याकिनाऱ्याने विमान चालले होते. सबंध किनारा अतोनात वैराण व एकाकी आहे. खोट्या खोट्या नद्यांची खोटी खोटी मुखं बघता बघता डोळे दुखू लागले व थोडी डुलकी लागली. थोड्या वेळाने जागी झाले ते एक धक्का मिळाल्यामुळे. खिडकीतून बाहेर पाहिले तो विमान ढगातून चालले होते. थोड्याच वेळात भारताचा किनारा दिसू लागला सह्याद्रीच्या रांगेवर लठ्ठ पोटाचे काळे ढग विसावत बसले होते. विमान ढगांच्या वर होते पण ढगांना फटी पडल्या होत्या व त्या रिफ्ट व्हॅलीमधून पश्चिम किनारा पाण्याने तुडुंब भरलेला दिसत होता. अरबस्थानचा निळा समुद्र जाऊन तिथे नदीच्या मुखातून आलेल्या गाळाने गढूळ झालेला समुद्र खाली दिसत होता. जिकडून तिकडून पाणी वाहात होते व जिथे थोडीशी म्हणून माती असेल तिथे वनस्पती उगवलेल्या दिसत होत्या. विमान वेगाने खाली उतरत होते व माझी सुजला, सुफला अशी आई सर्वांगाने ठिपकत आपल्या गार कुशीत घ्यायला तितक्याच वेगाने धावून वर येत होती.
 आफ्रिकेतला प्रवास झाल्यानंतर काही महिन्यांनी विमानाने मुंबईहून दिल्लीला जात होते. विमान सह्याद्री ओलांडून तापीच्या खोऱ्यावरून गेले आणि तापीच्या खोऱ्याची उत्तरेकडील भिंत- सातपुडा पर्वताची रांग-ओलांडताना एकदम ध्यानात आले की खरोखर तापी-पूर्णा खोरे ही पण एक रिफ्ट व्हॅलीच आहे. ह्या रिफ्ट व्हॅलीमध्ये तापी मागून आली. सातपुड्याची भिंत रिफ्ट व्हॅलीच्या भिंतीप्रमाणेच सरळसोट असून त्या बाजूने तापीला काही नद्या मिळत नाहीत. ही रिफ्ट व्हॅली आफ्रिकेतील रिफ्ट व्हॅलीच्या समकालीन असेल तर पूर्णा, तापी व नर्मदा ह्या तीन नद्यांच्या खोऱ्यांचा अभ्यास मनोरंजक होईल.

१९५९