पान:Bhovara-Iravati Karve.pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 

 यात्रा


 आम्ही भगवतीच्या देवळाजवळ उभे होतो. प्रवास करता करता भारताचे दक्षिण टोक गाठले होते. नकाशात लंका किती जवळ दिसते; पण येथून काही लंकेचा किनारा दिसत नव्हता! जिकडे पाहावे तिकडे समुद्र पसरला होता. पलीकडे काही जगाचा भाग असेल; तिथे माणसे राहात असतील, अशी कल्पनासुद्धा करणे जड वाटत होते. जमीन पायांखाली असेल तोपर्यंत चालत राहायचे. देशच्या देश, खंडच्या खंड पालथे घालायचे हे जरी कठीण असले तरी कल्पनेला समजण्यासारखे आहे.असेच चालत चालत नागड्याउघड्या रानटी मानवाने सारी पृथ्वी पादाक्रांत केली, पण जमिनीवरून अनंत सागरात माणसाने होडी लोटली तरी कशी ह्याचे मात्र आश्चर्य वाटते! कदाचित किनाऱ्याकिनाऱ्याने जाणाऱ्या होड्या वादळाने भडकून लांब गेल्या असतील, काही बुडाल्या असतील व काही दुसऱ्या किनाऱ्याला लागल्या असतील; मनुष्याला उमगले असेल, की आपली जन्मभूमी एवढीच काय ती पृथ्वी नसून अनंत समुद्रात ठिकठिकाणी भूमी विखुरलेली आहे. मनुष्य भविष्यकाळात काय करील हे चित्र रंगवायला जितकी मौज वाटते, तितकीच त्याने पूर्वी काय केले असेल याची कल्पना करण्यातही वाटते.
 आम्ही त्या शांत, निर्मनुष्य किनाऱ्यावर किती वेळ उभे होतो कोण जाणे, एकदम माझ्याकडे वळून तो म्हणाला, "आपण एकदा हिमालयात गेलं पाहिजे."
 ‘हो खरंच, कधी बरं जाऊ या?" व मग समोरच्या सपाट पसरलेल्या समुद्राकडे पाहातपाहात आम्ही उत्तुंग हिमालयाचे चित्र रेखाटले व जायचे बेत केले.

.