पान:Bhovara-Iravati Karve.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



भोवरा / ८९

वेळेला अरबस्तानचा प्रवास सकाळी होणार होता तेव्हा ताजेतवाने राहावे म्हणून तारे किंवा आकाश ह्यांकडे न बघता विमानात झोप काढली. सकाळी एडनचा रूक्ष विमानतळ आला. त्या वैराण प्रदेशावरून निघालो. सुदैवाने खिडकीशेजारी जागा मिळाली. विमान फार उंचावरून जात नव्हते, हवाही अगदी स्वच्छ होती; त्यामुळे खालचा प्रदेश लख्ख दिसत होता. पर्वतांच्या रांगा दिसत होत्या. कोठेही झाडझुडूप काही दृष्टीआड असे नव्हतेच. पर्वतांतून नद्या निघालेल्या उगमापासून दिसत होत्या. नद्यांचे संगम दिसत होते. नद्या दऱ्याखोऱ्यांतून वळणावळणाने कशा जात होत्या, ते दिसत होते. आम्ही समुद्रकिनाऱ्याला येऊन पोचलो, तेव्हा नद्यांची मुखे दिसू लागली. दहा दहा पंधरा-पंधरा मुखांनी, पंख्यासारखी पसरून एक एक नदी समुद्राला मिळाली होती. तेथे, भूशिरे दिसत होती. ह्या सर्व देखाव्यात वाण होती ती पाण्याचीच! पूर्वी एके काळी ह्या प्रदेशात नद्या वाहिल्या होत्या, त्यातले पाणी गेले आटून अन् आता फक्त ते पाणी कसे वाहिले, कुठून वाहिले हे दाखविणारे वाळवंटातून दिसणारे पात्र तेवढे राहिले.
 आफ्रिकेत ज्या परिषदेसाठी गेले होते, तिथे एकदोघा शास्त्रज्ञांनी अरबस्थानातील प्राचीन वस्तीबद्दल निबंध वाचले होते. ह्या कोरड्या पडलेल्या नद्यांकाठी मानववस्तीचे अवशेष सापडतात. एके काळी येथे माणसे होती, जनावरे होती, पाणी होते, झाडे होती, गवत होते, पाणी नाहीसे झाले तेव्हा इतरही सर्व नाहीसे झाले, एका काळच्या सुबत्तेच्या ह्या विलक्षण खुणा मात्र शिल्लक राहिल्या. कापाचा शृंगार गेला, भोकांची जखम मात्र राहिली. पाणी नाहीसे होण्याचे कारण बऱ्याच अंशी नैसर्गिक व काही अंशी मानवी कृतीत सापडते. नैसर्गिक कारण असे सांगतात की, युरोप खंडाला पाऊस आणणारे वारे पूर्वी भूमध्यसमुद्रावरून वाहात असत, व थोडासा पाऊस थेट अरबस्तानापर्यंत पोहोचे. का कोण जाणे, ह्या वाऱ्यांनी आपली दिशा किंचित बदलली हे एक, व दुसरे जॉर्डनची रिफ्ट व्हॅली उत्पन्न होताना भूमध्यसमुद्राचा किनारा सबंधच्या सबंध उचलला गेला, त्यामुळे जे काय चार ढ़ग येतात ते तिथेच अडकतात आणि अरबस्तानात पाऊस पडत नाही. मनुष्याची करणी म्हटले ती अशी, की माणसांनी आपल्या उपयोगासाठी अरण्येच्या अरण्ये कापली. जे काय थोडे गवत होते त्या जमिनीत नांगरट केली; आणि पाळीव गुरे व विशेषतः शेळ्या ह्यांच्या चरण्यामुळे गवत व रान ह्या दोहोंचाही फडशा पडला. खालचा प्रदेश पाहता पाहता मला नुकत्याच ऐकलेल्या एका गोष्टीची