पान:Bhovara-Iravati Karve.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८८ / भोवरा

दगड अमेरिकेतील वन्य जमाती वापरताना आढळलेले आहे. ह्या दगडांना ‘बोला' म्हणतात. एका लांब दोरीच्या शेवटी तीन लहान दोऱ्या लावतात. प्रत्येक दोरीच्या शेवटी एक एक दगड घट्ट गुंफतात ती लांब दोरी गरगर फिरवून जनावराच्या पायाच्या रोखाने फेकली की ती पायाभोवती गुंडाळून गेल्यामुळे जनावर कोलमडून पडते-पुष्कळदा त्याचा पाय मोडतो व ते शिकाऱ्याच्या हातांत सापडते. ह्या दोऱ्या वापरात नसतील तेव्हा गुंडाळून ठेवलेल्या असतात. आफ्रिकेतही मानवाने त्या तशा गुंडाळून ठेवलेल्या असणार. दोऱ्या कुजून नाहीशा झाल्या- दगड मात्र तीनतीनच्या पुंजक्याने राहिले! सरोवरे आटली, अरण्ये नाहीशी झाली, पशू गेले, माणसे गेली, फक्त त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा मात्र राहिल्या. आज तेथे आफ्रिकेतील एक सुप्रसिद्ध सोडा कंपनी कुदळीफावड्याने जमिनीवरील क्षार उकरून जगभर नेऊन विकीत आहे.
 ह्याप्रमाणे रिफ्ट व्हॅली, त्यांतली सरोवरे, त्यांच्यामध्ये उत्पन्न झालेल ज्वालामुखी पर्वत हे मिळून आजही एक आश्चर्यकारक दृश्य आहे; पण त्यापेक्षाही आश्चर्य म्हणजे ही सर्व प्रचंड घडामोड मानवेतिहासाशी गुंफली आहे. ही गुंफण इतकी गुंतागुंतीची आहे की, आत्ता कुठे तिचा थोडा थोडा उलगडा पडू लागला आहे. आफ्रिकेत काम करणारे शास्त्रज्ञ दर वर्षी ह्या ज्ञानात भर घालीत आहेत. रिफ्ट व्हॅली व तिच्याशी निगडित असलेला मानवेतिहास ह्यासारखी सुरस व चमत्कारिक कथा दुसरी नाही.
 आमचा मोटरचा प्रवास कधीच संपला होता. टांगानिका सरोवरापासून नायरोबीला आम्ही विमानानेच आलो. मोटरच्या प्रवासात ज्याप्रमाणे ठिकठिकाणी थांबून प्रदेश पाहता आला तसे विमानात करता येईना. शिवाय विमान अतिशय उंचावरून जाते व खाली धुके असते त्यामुळे काही विशेष दिसल नाही. नायरोबीजवळच्या रिफ्ट व्हॅलीत परत गेलो. तेथल्या पाहण्यासारख्या जागा पाहून झाल्यावर मी हिंदुस्थानचे विमान पकडले. ज्या प्रदेशावरून विमान जात होते तो प्रदेश बराच रूक्ष होता. कुठे शेतीही फारशी दिसत नव्हती; कुठे अरण्यही फारसे दिसत नव्हते. तिथली लोकवस्ती अतिशय विरळ आहे व आफ्रिकेतील बऱ्याचशा भटक्या व गुरांवर उपजिविका करणा-या टोळ्या तेथे राहतात. विमान संध्याकाळी निघाल्यामुळे खालचा देखावाही लवकरच दिसेनासा झाला. येताना हा प्रवास दिवसाउजेडी झाल्या असल्यामुळे मला त्याचे काही विशेष वाटले नाही. ह्या