पान:Bhovara-Iravati Karve.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८६ / भोवरा

सरोवराचा तळ समुद्रसपाटीच्या वर आहे. पण काही ठिकाणी सरोवराचा तळ समुद्रसपाटीपेक्षा खोल आहे. अशा तहेचे जलसंचय समुद्राला मिळणे शक्यच नव्हते. जॉर्डन नदी आतल्या आतच एका सरोवराला मिळते, त्याला मृत समुद्र म्हणतात. टांगानिका सरोवराच्या प्रदेशात बराच पाऊस पडला म्हणजे पाण्याचा एक प्रवाह डोंगराडोंगरांतून वाट काढीत काँगो नदीच्या खोल्याला मिळतो. आफ्रिका व अरबस्थान ह्यांना विभागणारा तांबडा समुद्र हीसुद्धा एक रिफ्ट व्हॅलीच आहे. म्हणजे जॉर्डन नदीच्या खो-यापासून ते थेट व्होडेशियापर्यंत अशा कितीतरी रिफ्ट व्हॅली पसरल्या आहेत. काही लोकांची कल्पना अशी आहे की, पूर्वीच्या काळी टांगानिका सरोवर, व्हिक्टोरिया सरोवर, आल्बर्ट सरोवर, रुडोल्फ सरोवर व केनियाच्या रिफ्ट व्हॅलीमध्ये असलेली इतर लहान लहान सरोवरे मिळून पाण्याचा एक प्रचंड प्रवाह उत्तरेकडे वाहात होता. आतासुद्धा माझ्या शेजारी बसलेला इंग्रज शास्त्रज्ञ मला सांगत होता, “कर्वेबाई, तुम्हांला आत्ताचा देखावा भव्य वाटतो आहे. पण कल्पना करा, दोन्ही तीरानी भरून पूर्वी एक नदी येथून जवळजवळ १००० मैल वाहत होती. काय त्या वेळेला दिसत असेल, नाही? आज जगामध्ये वाहणाच्या कोणत्याही नदीपेक्षा ही नदी मोठी होती." कल्पना तर मोठी भव्य होती. पण ती कल्पना की सत्य, ह्याबद्दल मात्र बराच वादविवाद आहे. वरती ज्या सरोवरांची नावे घेतली त्यांतल्या कितींच्या तरी मध्ये डोंगरांच्या रांगा आहेत. तेव्हा एका सरोवराचे पाणी दुसऱ्यात जात असेल, ह्याविषयी पुष्कळ लोक शंका घेतात. हा प्रश्न न सुटायचे एक कारण म्हणजे वर सांगितलेल्या २००० मैलांच्या टापूत ठिकठिकाणी पृथ्वीला कित्येक मैल लांब व कित्येक मैल रुंद भेगा पडल्या. त्या भेगांतून नद्या वाहू लागल्या आणि मग कधी तरी त्याच टापूत मोठमोठे ज्वालामुखी पर्वत उत्पन्न झाले. ज्या पर्वतांच्या रांगा निरनिराळ्या रिफ्ट व्हॅलींना छेदून गेलेल्या आहेत, त्यांतल्या बऱ्याच ह्या ज्वालामुखींच्या वर येण्यामुळे बनलेल्या आहेत. सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जमीन दुभंगणे, लांबच लांब पर्वतांच्या रांगा उत्पन्न होणे, ह्या उलाढाली मानवजाती हयातीतल्या आहेत. आपल्याकडे सुद्धा पूर्वी एका काळी समुद्र होता; तिथे हिमालय उत्पन्न झाला, पण हिमालयाची उत्पत्ती पहायला मानव पृथ्वीवर आलेला नव्हता. रिफ्ट व्हॅली उत्पन्न होताना मानव कदाचित उत्पन्न झाला नसेल, पण रिफ्ट व्हॅलीतून वाहणाऱ्या प्रचंड नद्या किंवा आत्ताच्यापेक्षा दसपट