पान:Bhovara-Iravati Karve.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

  'भोकं राहिली'

 टांगानिका सरोवराच्या जवळजवळ दक्षिण टोकाला पण पूर्वेकडे असलेल्या उंच पर्वतावर आम्ही बसलो होतो, ही पर्वतांची रांग टांगानिका सरोवराची पूर्वेकडची भिंत होती. मध्ये ४०० मैल लांब व ५० मैल रुंद असे प्रचंड सरोवर पसरले होते. पश्चिमेस अशीच एक पर्वतांची रांग भिंतीसारखी उभी होती. आम्ही बसलो होतो दाट झाडांच्या सावलीत. पण समोरचा देखावा मात्र उन्हात तरंगत होता. समोरची पर्वतांची रांग स्पष्ट दिसत नव्हती. सरोवराचे पाणी कोठे संपते व वातावरणास सुरुवात कोठे होते, तेही स्पष्ट दिसत नव्हते. आम्ही समोर नकाशा पसरला होता. हाताशी दुर्बीण होती. नकाशात पहावयाचे व दुर्बीण डोळ्यांना लावावयाची असे चालले होते. दुर्बिणीतूनही स्पष्ट दिसेना. शेवटी मी कंटाळून समोरचे भव्य पण किंचित अस्पष्ट चित्र पाहात बसले.
 मी बघत होते तो देखावा नुसता भव्य व रमणीयच नसून ते एक पृथ्वीवरले मोठे आश्चर्य होते. लहानपणापासून ज्याच्याबद्दल वाचले होत- जे नकाशात परत परत पाहिले होते, ते आज प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहात होते. नकाशात एका मोठ्या कागदावर गोष्टी कशा स्पष्ट समजतात. पण प्रत्यक्ष गोष्ट एवढी मोठी असते की, दिवस न् दिवस प्रवास करूनही तिचे आकलन होत नाही. तसेच आजही झाले. टांगानिका सरोवर हा आफ्रिकेतील आश्चर्यकारक रिफ्ट व्हॅलीचा एक भाग आहे. तेसुद्धा एका दृष्टिक्षेपात दिसत नव्हते; तर संबंध रिफ्ट व्हॅली कशी दिसणार? मागच्या वेळेला म्हणे कॉन्फरन्समधल्या काही लोकांनी एक विमान भाड्याने घेऊन सबंध रिफ्ट व्हॅली बघून घेतली. ह्या वेळी आम्ही २०० माणसांनी ५० मोटरीतून