पान:Bhovara-Iravati Karve.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / ८३



 * द्वारका लाकडाची बांधलेली होती. तिच्याभोवती मोठा कोट असून त्यांत दारे ठेवलेली होती म्हणूनच तिचे नाव द्वारावती असावे किंवा पश्चिमसमुद्राचे दार म्हणून द्वारका. घराघरांतून पेटलेल्या चुलीतील आगीत काही भाग धरणीकंपाने कोसळून पडतो व मोठमोठ्या आगी लागतात. अशी प्रचंड आग टोकिओला १९११ साली लागली होती. आगीपाठोपाठच मोठमोठ्या लाटा येऊन धरणीकंपाने खचलेली द्वारका नाहीशी झाली असण्याचा संभव आहे. अशा परिस्थितीत अती प्राणहानी होते व फारच थोडे लोक वाचतात. असा धरणीकंप होण्याच्या आधी पुष्कळदा लहान लहान धक्के बसतात व त्या सूचनेने लोक पळून जातात. रोमन लोकांचे पाँपी शहर ज्वालामुखीने नष्ट झाले. द्वारका खचून खरोखरच समुद्रात गेली असली तर तिचे अवशेष सापडणे कठीण आहे; पण खणणाऱ्याच्या हाती काय लागेल ते सांगवत नाही. कदाचित् धरणीकंपाने, आगीने अर्धवट जळलेली द्वारका सापडायची देखील. पाँपी शहरात आज जी अद्भुत दृश्ये दिसतात, तशीसुद्धा दिसतील. काही यादवस्त्रिया व पुरुष रस्त्यावरून पळताना एक पाय जमिनीवर, एक पाय उचललेला अशा स्थितीत मेलेले व उभेच्या उभे गाडलेले आढळायचे. काही आंघोळ करताना, काही चुलीजवळ, काही रथात- छेः कल्पनाच नको. त्यापेक्षा जुनी द्वारका समुद्राच्या लाटांनी झाकलेली आहे तशीच असू दे.
 खरी द्वारका आपल्या निर्मात्याबरोबर गेली तर मग ही सध्याची द्वारका काय आहे? ही द्वारकेची वास्तू नाही, प्रतिकृती नाही; केवळ त्या रम्य नावाने मिरवणारी एक विकृती आहे.