पान:Bhovara-Iravati Karve.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / ८१

स्वप्न होते. श्रीकृष्णाबरोबर द्वारकेचे जड रूप जाऊन ती एखादी रम्य स्वप्नाची स्मृती म्हणून राहिली आहे. खरी द्वारका कशी होती कोण जाणे, पण प्रत्येक कवी आपापल्या मनाप्रमाणे उद्यानांनी वेढलेली, राजवाड्यांनी नटलेली, एक खांबावर पेललेली सोन्याची द्वारका निर्माण करतो.
 भर्तृहरी जेव्हा गतकाळातील ‘कोणा एक्या रम्य' नगरीचे वर्णन करतो, त्या वेळी तेथील मोठा सम्राट, इतर मांडलिक राजे, स्तुतिपाठक, सुंदर स्त्रिया, हास्य विनोद ह्याबरोबर उच्छृंखल वागणाऱ्या राजपुत्रांचाही उल्लेख करतो-‘उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहः।' आणि खरोखरच द्वारकेचा नाश अशाच उनाड, दारूबाज, जुगारी, रंगेल आणि रगेल यादव राजपुत्रांच्या वर्तनाने झाला ती कथा सर्वांना माहीतच आहे. जैनांची कथा महाभारत कथेहून निराळी आहे ती अशीः द्वारकेचा नाश मद्यपी यादवांमुळे द्वैपायन करील, असे नेमिनाथांचे भविष्य ऐकून कृष्ण-बलरामांनी यादवांच्या हाती लागू नये म्हणून सर्व मद्य द्वारकेबाहेरच्या एका रानातील गुहेत ठेवले होते. शिकारीवर गेलेल्या राजपुत्रांच्या हाती ते लागले. अनेक वर्षांची ती मुरलेली उत्कृष्ट दारू पिऊन झिंगलेल्या कुमारांनी द्वैपायन ऋषीला लाथाबुक्क्यांनी मारले व त्याने हा अपमान मनात धरून, एक दिवस संधी साधून द्वारकेला आग लावून दिली व सर्व दरवाजे रोखून धरले. कृष्ण-बलरामांना कोणालाही वाचवता येईना. निदान वसुदेव-देवकीला तरी वाचवावे म्हणून त्यांनी त्यांना रथात घातले पण जनावरे पुढे पाऊल टाकीनात, तेव्हा स्वतः दोघांनी रथ ओढीत नेला तो आस निखळला. दाराशी यमाप्रमाणे द्वैपायन होता. त्याने परत निक्षून सांगितले की, तुम्ही दोघे जा, मी इतरांना जाऊ देणार नाही. वसुदेवानेही काकुळतीने सांगितले, तुम्ही जा; निदान तुम्ही तरी जिवंत आहात असे समजून आम्ही सुखाने मरू. शहर धाडधाड जळत होते. धूर आकाशापर्यंत भिडला होता, रस्त्यारस्त्यांतून बायका, मुले व पुरुष ‘कृष्णा, आम्हांला सोडीव, रामा, आम्हांला सोडीव', असा आक्रोश करीत होते. कृष्ण तेथेच मरावे असा निश्चय करीत होता, पण वसुदेवाच्या आज्ञेमुळे भ्रातृवत्सल बलरामाने त्याला ओढीत बाहेर नेले. श्रमाने क्लांत होऊन झाडाखाली निजलेल्या कृष्णाला त्याच्याच एका बांधवाने हरिण समजून मारले; व स्वतःची नगरी जळत असलेली पाहात पाहात, दैवाला शिव्याशाप देत कृष्ण परलोकवासी होऊन नरकात गेला अशी ही कथा आहे. ह्या कथेतील कायंबिनी दारूचे वर्णन व