पान:Bhovara-Iravati Karve.pdf/80

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८० / भोवरा

होती; पण कंसाची बायको सम्राट जरासंधाची मुलगी होती. तिने बापाला यादवांवर सूड घेण्याची चेतना दिली व जरासंधानेही यादवांचा नि:पात करण्याचा चंग बांधला. एकदा, दोनदा, तीनदा, पुनःपुनः यादव वीरांनी जरासंधाचा प्रतिकार करून त्याला मागे रेटले. पण जरासंधाने प्रयत्न सोडला नाही. त्याने पश्चिमेकडील योनांचे साहाय्य मिळविले व कालयवन आणि तो अशी दुहेरी सैन्ये मथुरेवर चालून आली. आता आपल्या चिमुकल्या यादवसेनेचा निभाव लागणे शक्य नाही. हे ओळखून कृष्णबलरामांनी सर्व यादवांसह मथुरा सोडली. रजपुताना, उत्तर गुजराथ व काठेवाड हे तीन रूक्ष प्रदेश ओलांडून ते समुद्रकिनाऱ्याला आले. तेथे रैवतक पर्वताशेजारी सपाट, वाहने चालवण्यास योग्य अशी भूमी त्यांना दिसली. कृष्णाच्या मर्जीखातर समुद्राने थोडे मागे सरून हे क्षेत्र नवीन शहर वसवावयास दिले व कृष्णाने विश्वकर्म्याच्या साहाय्याने एक रम्य व अजिंक्य नगरी वसवली- तीच द्वारका ऊर्फ द्वारावती. त्या ठिकाणी आल्यावर यादवांना उसंत मिळाली व ते पुन्हा बलशाली झाले; म्हणजे ‘द्वारका' हे कृष्णाच्या पराजयाचे प्रतीक. हरिवंशात जेव्हा वैशंपायन द्वारकेचे वर्णन करू लागतात तेव्हा जनमेजय त्यांना मधेच थांबवून विचारतो की, ‘मुनिवर्य, सुपीक, रम्य धनधान्ययुक्त असा यमुनाकाठचा मध्यप्रदेश सोडून यादव द्वारका वसवायला इकडे वाळवंटात कुठे आले?' तेव्हा वैशंपायनाला सर्व कथा सांगावी लागली. तरीदेखील कृष्णाचा पराजय शक्य तो कमी लेखून, द्वारकेचा मोठेपणा वर्णन करून मुनिवर्यांनी वेळ मारून नेली. विशेषतः रुक्मिणीहरणामुळे कृष्णाचा व द्वारकेचा दरारा वाढला व द्वारकेच्या जन्माच्या मागची यादवपराजयाची स्मृती इतकी लोपली की नरेन्द्र आपल्या “रुक्मिणी स्वयंवरात" द्वारकेचे वर्णन "देवाचेया दादुलेपणाचा उबारा, न साहवे सातही सागरा, भेणे वौसरोनी राजभरा, दीधली द्वारावती" असे करतो.
 हस्तिनापूर, गिरिव्रज, मथुरा वगैरे महाभारतकालीन शहरे भारतीय युद्धाच्या आधी व मागूनही होती. कैक राजकुले त्यात नांदली, वैभवाला चढली व नष्ट झाली; पण द्वारकेचे तसे नाही. द्वारकेचे नाव फक्त श्रीकृष्णाशा निगडित आहे. श्रीकृष्णांनी तिला निर्मिले व श्रीकृष्णाबरोबर ती नाहीशी झाली. श्रीकृष्ण साकारलेले चैतन्य होते; तर द्वारका श्रीकृष्णाचे साकारलेले