पान:Bhovara-Iravati Karve.pdf/78

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७८ / भोवरा

म्हणत होते. आजोबांचे शब्द किती स्पष्ट! दगडावर कोरून लिहावे त्याप्रमाणे एकएक अमृताची ओळ माझ्या कानांवर पडत होती व माझ्या हृदयावर कोरली जात होती. माझे मन शांत झाले. हा आशीर्वाद घेऊन मी कर्व्यांच्या घरी आले.
 दुसरा प्रसंग नुकताच पाच-सहा वर्षांपूर्वी घडला. आजोबांना घेऊन आम्ही सर्वजण हैदराबादला माझ्या भावाकडे दिवाळीला गेलो होतो. दिवाळीच्या अवसेच्या दिवशी बंगला शृंगारण्यात, मुले दारू उडवीत होती ते पाहण्यात श्रम व जाग्रण झाले होते. शिवाय सुटी म्हणून आम्ही उशिराच उठत असू. माझा भाऊ व आजोबा सहाच्या आतच उठून चहा वगैरे घेत आणि आजोबा गरम कपडे घालून बागेत फेऱ्या घालीत. तसेच पाडव्याच्या दिवशी घालीत होते. त्यांचा पायरव येऊन मी जागी झाले. एवढ्यात त्यांनी गाणे म्हणायला सुरुवात गेली. “अंतरिचा ज्ञानदिवा मालवूं नको रे-" पाडव्याच्या पहाटे ऐकलेले हे शब्द असेच हृदयात कोरून राहिले आहेत. आयुष्याच्या ह्या काळात परत आजोबांनी मार्ग दाखवला. पहिल्या आशीर्वादाने पूर्वायुष्य उजळले, आताच्या उपदेशाने उत्तर आयुष्यात माझा सोबत व्हावी.
 ‘नुकतीच एका अमेरिकन मित्राला स्थितप्रज्ञ म्हणजे काय, ज्ञानोत्तर व्यवहार म्हणजे कसा असतो हे समजावून सांगत होते. तासभर आमचे संभाषण झाल्यावर त्याने विचारले, “अहो, तुम्ही सांगता तसे माणूस कधी खरोखरीचे तुमच्या पाहण्यात आले आहे का?"
 मी विचार करून उत्तरले, “पाहण्यात काय, माझ्या घरात असे माणूस आहे; पण मी इतकी पापी, की ही स्वभावलक्षणं ज्ञान्याची का आत्मतुष्ट आत्मकेंद्रिताची हेच मला कळत नाही."
 केवढे माझे भाग्य, की मी अशा माणसाची सून झाले! त्याहीपेक्षा केवढे महत्तर माझे भाग्य, की मी अशा माणसाची बायको झाले नाही!