पान:Bhovara-Iravati Karve.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / ७७



नाहीत. कुठे पैसे द्यायचे झाले म्हणजे आपण आकडा सुचवला की दे म्हणतात. मला वाटते, पैशाचा मुळीच हिशेब केला नाही अशी हीच वर्षे त्यांच्या आयुष्याची असावीत. आम्ही त्यांच्यासाठी चांगले चांगले कपडे शिवून आणतो व त्यांचेच पैसे खर्च करतो. तरीही खूप पैसे उरतात. दर वर्षी संस्था व व्यक्ती मिळून तीन-चारशे रुपये तरी इकडेतिकडे दे म्हणून दिनकरला सांगतात. फक्त दर महिन्याला न्हाव्याचे पैसे व सुपारीचे पैसे आपल्या पैशातून मागून घेऊन देतात! जुन्या सवयीचे एवढेच वैशिष्ट आता राहिले आहे.
 त्यांचे वागणे प्रसन्न, वाणी गोड व त्या सर्वांपेक्षाही हसणे गोड, मनमोकळे व खदखदून आहे. मुद्दाम उपचाराने वागणे त्यांना जमत नाही. पण नैसर्गिक वागणेच इतके आर्जवी की मनुष्य मोहून जातो. माझ्या आईला मी पुष्कळ अर्ज-विनंत्या करून माझ्या घरी राहावयाला बोलावते. सासूबाई होत्या तेव्हा त्यांनी आईला पाहिले की हसून म्हणावे, “का भागीरथीबाई, आलीस वाटतं! आता बरेच दिवस मुक्काम असेल?" ह्या पहिल्या सलामीनंतर माझ्या आईला चारदोन दिवस राहवून घेणेसुद्धा शक्य होत नसे. आता आई आली व आजोबांनी तिला पाहिले म्हणजे तेही हसून म्हणतात, “कोण? भागीरथीबाई का? फार दिवसांनी आला?" एवढ्यावर आई अगदी प्रसन्न होते. "अग, त्यांनी मला ओळखलं ! चारच महिने झाले ना जाऊन, पण फार दिवसांनी आलात म्हणाले." असे दिवसातून दहादा मला सांगते.
 आजोबांनी मुद्दाम आशीर्वाद दिला नाही. पण आयुष्यातले दोन प्रसंग आजोबांमुळे चिरस्मरणीय झाले आहेत. माझ्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी कर्व्यांकडचे जेवण होते. लग्नांत दोन्हीकडच्या निरनिराळ्या नातेवाईकांकडून इतका आचरटपणा व आडमुठेपणा झाला होता, की मी अगदी कावून गेले होते. मन अप्रसन्न, भांबावलेले असे होते. पंक्तीत श्लोक म्हणणे चालले होते. नेहमी शेवटचा श्लोक आजोबांनी म्हणावयाचा अशी इकडे पद्धत आहे. आजोबांचा आवाज नाणे वाजवावे असा खणखणीत व वाणी स्पष्ट आहे. माझ्या मनस्तापात इतर काय म्हणाले, इकडे माझे लक्षही नव्हते. पण आजोबांच्या आवाजाने व उच्चारांच्या स्पष्टपणामुळे माझे मन वेधले. “प्रेयो मित्रं बंधुता वा समग्रा" हा श्लोक आजोबा सावकाशपणे