पान:Bhovara-Iravati Karve.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७६ / भोवरा

कपाटातून कोट काढून दिला. विजार होती लोकरीच्या कापडाची, तपकिरी रंगाची. कोट होता लोकरीचाच पण राखी रंगाचा. कोट हाती घेतला व मला म्हणाले, "हे काय, ह्या विजारीवर हा कोट कसा चालेल? बरा दिसेल का?" मी “छान आहे." म्हटले; पण माझे मत मानायला ते तयार नव्हते. भास्करने “छान आहे, शोभतो." असे म्हटल्यावर तो कोट घातला. दिनू गावाला गेला होता. तो परत आल्यावर त्याला ही हकीकत सांगितली, तेव्हा त्याने मुकाट्याने कोटाच्या रंगाची नवी विजार करवून आणली! न्हावी जर पंधरवड्याने आला नाही तर उद्गारतात, “अरे, केस बरेच वाढले आहेत. जा बरं, न्हाव्याला बोलवून आण” हल्ली विस्मरण फार होते. न्हावी एका आठवड्याने आला तरी परत केस कापायला बसतात! आजोबा वहाण घालून सतरंजीवर पाऊल टाकीत नाहीत. सतरंजीच्या बाहेरच्या फरशीवर वाहणेशिवाय चालत नाहीत!
 पूर्वी आजोबा कफल्लक असत. सासूबाईंना महिना रुपये पस्तीस (हे त्यांनी भांडून भांडून मिळविले होते), आमच्या घरी राहायला आले म्हणून आम्हांला रुपये पंचवीस (गेली १५ वर्षे देत आहेत. हा अपरिग्रहाचा एक भाग); एवढे गेले म्हणजे सत्तर रुपये पेन्शनीपैकी फक्त दहा रुपये उरत. त्यांत स्वतःचे करावयाचे म्हणजे फार काटकसरीने राहावे लागे. मी मागे म्हटले की त्यांचे कुटुंबाकडे लक्ष नव्हते. पण एक मात्र अपवादात्मक गोष्ट आठवते. त्यांनी २५ वर्षांपूर्वी अप्पांना एक हजार रुपये दिले. इतर मुलांना तेवढे दिले होते म्हणून. अप्पांनी ताबडतोब मोठ्या उत्साहाने ते हजारच्या हजार ‘संततिनियमन' ह्या पुस्तकाची नवी आवृत्ती काढण्यात खर्च करून टाकले. नंतर बऱ्याच वर्षांनी परत अप्पांचे नीट चालत नाही, बायकोच्या आजारामुळे अतोनात खर्च झाला, वगैरे गोष्टी यांच्या ध्यानात आल्या. अर्थात हे गुपित नव्हते. आम्ही सर्व व खुद्द अप्पाही त्याबद्दल बोलत असत. पण ते ऐकून ध्यानात धरले हे नवल! अप्पाच्या हातांत पैसे दिले तर लगेच खर्च करून टाकील, म्हणून त्यांनी भास्करजवळ तीन हजार रुपये हिंगण्याच्या संस्थेत ठेवावयास दिले व सांगितले की अप्पाला कधी गरज लागली तर ह्यांतून दे. सासूबाई गेल्यानंतर आजोबांचा खर्चच नाहीत झाला. त्यांनी स्वतः व दिनकर ह्या जोड-नावाने बँकेत खाते काढले. त्या पैसे पडत असतात. ते स्वतः कधी किती पैसे आहेत, ह्याची चौकशी करीत