पान:Bhovara-Iravati Karve.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / ७५

आमच्यातले इवलेसे देतो. आजोबांना वाटते, आपण कधी जास्त मागत नाही; अगदी काटेकोरपणे वाट्याचे तेवढे खातो. गौरीला पण तसेच वाटते!
 आजोबांची टापटीप फार असते. सगळे कपडे अगदी नीट घड्या करून जागच्या जागी ठेवलेले असतात. कपडे मळले तर आजकाल त्यांच्या लक्षात येत नाही; म्हणून ते पाहून धोब्याला देण्याचे काम दिनूचे. किती माणसे म्हातारी झाली, पेन्शनात आली, म्हणजे कपड्यालत्त्यांत फार गबाळेपणा करतात. काही कार्यकर्त्यांना गबाळेपणा म्हणजेच कर्तृत्वाची निशाणी वाटते, ह्यांनी कधीही गबाळेपणा केला नाही, पोषाख साधाच. पण तो नेहमी टापटिपीचा असतो. सदऱ्याचे किंवा कोटाचे बटण तुटले तर "अग, हे एवढं बटण शिवून दे बरं" असे सांगतील. शर्ट लांब हाताचा घालतात व कफांना बटणाऐवजी रुंद एक इंच बंद शिवलेला असतो. ह्यामुळे बटणे किंवा कफलिंक घालाय-काढायचा त्रास वाचतो. हा बंद बरेचदा उसवतो; पण उसवलेल्या बंदांचा शर्ट ते कधी घालीत नाहीत. बाहेर जाताना धोतर, लांब कोट व टोपी (पूर्वी रुमाल) असा त्यांचा पोशाख. कुठे जायचे असले म्हणजे ठरलेल्या वेळेआधी पंधरा मिनिटे ते तयार होऊन बसतात. दोन वर्षांपूर्वी रात्री नवाला कुठच्या तरी सभेला जायचे होते; म्हणून ते पाऊणेनऊलाच पोशाख करून तयार राहिले. साडेनऊ झाले; त्यांना घेऊन जाणाऱ्या माणसाचा पत्ता नाही. ते पोशाख बदलून येऊन बैठकीच्या खोलीत वाचीत बसले. एवढ्यात त्यांना घेऊन जायला मोटार घेऊन गृहस्थ आले. मी खूप रागावले. हे फक्त म्हणाले, "थांबा, येतो." मी म्हटले, “असू दे आता पायजमा, धोब्याकडचा आहे. वर फक्त कोट घाला." पण छे! त्यांना नाही ते पटले. ते परत खोलीत जाऊन नीट पोशाख करून आले.
 नुकतीच झालेली गोष्ट. मी कुठून गावाहून आले होते. बैठकीच्या खोलीत खुर्चीवर एक फ्लॅनेलची विजार दिसली. चौकशी करता समजले की ती दिनूने आजोबांसाठी शिवायला टाकलेली त्याच शिंप्याकडून आली होती. आजोबांना दुसऱ्या दिवशी सकाळी कुठे सत्कारसमारंभासाठी जायचे होते. फेब्रुवारीचे दिवस. थंडी बरीच होती. मी म्हटले, “आज धोतर नका नेसू. नवी फ्लॅनेलची विजार घालून जा!" त्यांनी विजार पाहून अगदी पसंतीने मान डोलवली. आंघोळ करून कपडे करू लागले. विजार घातली. मी