पान:Bhovara-Iravati Karve.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / ७३

लसणाची तिखट चटणी व त्यावर तेल ह्या गोष्टी आजही ते आवडीने खातात. अंबाडीची किंवा फणसाची भाजी, त्यावर लसणाच्या फोडणीचे तेल ह्या जिनसा ते मिष्टान्न म्हणून खातील. चार माणसांसारख्या आवडीनिवडी आहेत, पण त्या आवडीनिवडींचा त्यांनी कधी बडेजाव केला नाही. अमके सात्त्विक, अमके तामस, अशा निरर्थक चिकित्सा करीत बसले नाहीत. सर्व खाणे सारखेच- सर्व पदार्थांनी त्यांच्या पोटात जाऊन त्यांची प्रकृती धारण केली. अन्नाला त्यांचे गुण आले. त्यांनी कधी अन्नाचे गुण धारण केले नाहीत. मी दिवसातून चारदासुद्धा चहाकॉफी पितो, असे त्यांनी सांगितले की कित्येक आहारचिकित्सक अगदी वाईट तोंड करून निघून जातात.
 जी गोष्ट जिभेची तीच इतर इंद्रियांची. गृहस्थाश्रमाचा त्यांनी उपभोग घेतला- आनंदाने घेतला. स्वतःचा मोठेपणा वाटण्यासाठी बायकोच्या कामुक वृत्तीचा उल्लेख काही महात्म्यांनी केला. काहींनी ब्रह्मचर्याचा डांगोरा पिटला, काहींनी आपल्या सहकाऱ्यांवर व अनुयायांवर नसते नियम लादले. आजोबा स्वतःचे जीवन पूर्णतया जगले. अगदी छिद्रान्वेषी मनुष्यालासुद्धा त्यांच्या आयुष्यात स्त्रियांच्या बाबतीत वावगे असे काही सापडणार नाही. स्त्रियांच्या संस्थेत, त्यातून विधवाश्रमात, काम करण्यात जन्म गेला; पण त्यांनी कधी कोणत्याही मुलीला आपली सेवा करू दिली नाही. मर्यादेची लक्ष्मणरेषा त्यांनी कुठल्याच बाबतीत, कधीही ओलांडली नाही. तसा गवगवा त्यांनी केला नाही.
 त्यांना सौंदर्यदृष्टी मात्र आहे. पूर्वी ते कोणाशी कधी फारसे बोलले नाहीत. आताही इतरांशी बोलत नाहीत. पण ते स्वतःशीच मोठ्याने व स्वच्छ बोलतात, ते आम्हांला ऐकू येते आणि साहजिकच त्यांचे विचार कळतात. एखाद्या दिवशी माझ्या हृदयात कसेसेच होते. त्यांनी लपवलेले विचार आज उघडे होत आहेत आणि जे पाहण्याचा आपल्याला अधिकार नाही ते आपण पाहात तर नाही ना, अशी अपराधाची जाणीव मनाला होते. पण मी आपण होऊन ऐकत नाही, आणि जे ऐकते ते इतके निर्व्याज असते की, त्यांच्याजवळ लपवायला काही नव्हतेच हे समजून येते. लोकांच्याजवळ लपवायचे म्हणून ते अबोल नव्हते, अबोलपणा हा त्यांचा स्वभाव होता. परवा ‘वन्य जाती' ह्या मासिकाचा अंक माझ्या टेबलावर