पान:Bhovara-Iravati Karve.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७२ / भोवरा

हालांचे रसभरित वर्णन किती लोक करतात; पण रेशन आले व गेले,आमच्या घरात आजोबांनी कसलीच दखल घेतली नाही.
 ते सत्तर वर्षांचे असताना त्यांचे बरेच दात पडले होते. शिल्लक होते त्यांत खालचा व वरचा दात एकत्र येऊन चावण्यास मदत होईल अशा जोड्या नव्हत्या. खाण्याचा त्रास होई. मुलांनी सांगितले, नवे दात बसवा आणि त्यांनाही ते पटले. पण सासूबाई त्यांना दात बसवू देईनात. त्यांना निरनिराळी कारणे पुढे केली. त्या म्हणत, “ज्या वयात दात पडतात व वयात आपण दातांनी चावावे लागतील असे जिन्नस खाऊ नयेत अशी देवाची योजना आहे."
 पण सासूबाईंच्या कानांत देव आपल्या योजना कुजबुजतो है मानावयास आजोबा काही तयार नव्हते. ते म्हणत, "देवाने नागडे जन्म घातले म्हणून आपण काही जन्मभर नागडे राहात नाही. डोळे अधू झाले तर चष्मा लावून वाचतोच की.”
 मग सासूबाई म्हणत, “अहो, दात काढताना शेरभर रक्त जाईल." हरकत नाही"
 शेवटी सासूबाईंनी अगदी रामबाण मुद्दा काढला. त्या म्हणाल्या "अहो, आता सत्तराव्या वर्षी दोन-अडीचशे रुपये खर्च करून दातांची कवळी घेणार? समजा, काही बरेवाईट झाले तर ती कोणाच्या उपयोग का पडणार आहे? जोडे, कोट वाटले तर नवीन घ्या. पण एका कवळीपायी एवढे पैसे नका घालवू”
 हा मुद्दा आजोबांना पटण्यासारखा होता. पण दातांमुळे नुसती स्वतःचीच गैरसोय होत नव्हती, तर इतरांनाही त्रास झाला असता; आपल्यामुळे एवढासुद्धा त्रास कोणाला होऊ नये अशी त्यांची इच्छा. ते सासूबाईंशी बोलले नाहीत. सासूबाईंना वाटले, आपण जिंकली. आजोबा एकदा अप्पांकडे राह्यला म्हणून गेले. आठपंधरा दिवस राहून नवीन कवळी बसवून आले व सासूबाईंनी खूप बडबड केली, ती ऐकून घेतली.
 इतर जेवतात ते आजोबा जेवतात. वेडी वेडी बंधने आपल्यावर लादून घ्यायची, त्यांची जाहिरात करायची आणि ती पाळता यावीत म्हणून आपल्याला व जगाला त्रास द्यायचा, अशी त्यांची वृत्तीच नाही. खरेखुरे गरिबीचे जेवण ते आवडीने जेवतात. बाजरीची, जोंधळ्याची भाकरी,