पान:Bhovara-Iravati Karve.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / ७१

आहे. फक्त लिहिण्यावाचण्याचा आनंद शरीराला मिळाला म्हणजे पुरे; इतर कोणताही आनंद पापमय आहे म्हणून त्यापासून दूर राह्यचे, अशी कल्पना बऱ्याच ऋषितुल्य मोठ्या माणसांची भारतात आहे. पण आजोबा त्याला अपवाद आहेत. ते आपणहून एखाद्या आनंदासाठी धावपळ करीत नाहीत; तो आनंद मिळाला नाही तर त्यांना चुकल्याचुकल्यासारखे वाटत नाही. त्यांची वृत्ती सदैव प्रसन्न, आनंदमय आहे; पण एखादी चांगली गोष्ट मिळाली तर अगदी आस्वाद घेऊन ते तिचा उपभोग घेतात. ते कधीही दारूसाठी हपापलेले नसतात. असा एखादा जिन्नस जगात आहे ह्याची नित्याच्या व्यवहारात त्यांना दखलही नसेल. पण त्यांच्या मुलाने त्यांना रोज रात्री निजायच्या आधी घोटभर पिण्यासाठी म्हणून मद्य (Wine) आणून दिले होते; ते अगदी स्वाद घेत घेत, मान डोलवून, “छान लागते !" असे म्हणत ते घेत. बाटली संपली- मग त्याबद्दल बोलणे नाही. त्यांचे खाणे मांसाहाराचे नव्हे; पण कांदे घातलेले अंड्याचे चुरचुरित ऑमलेट ते आवडीने खातात. कोंबडीच्या किंवा बैलाच्या मांसाच्या अर्काचे गरम गरम सूप ते चमच्याचमच्याने मिटक्या मारीत मारीत पितात. बाटली संपली की ते खाणेही संपले. ते त्यांचा विचारही करीत नाहीत. त्यांना पोळी किंवा फार तूप असलेले पदार्थ आवडत नाहीत. पण बाहेर गेले की लोक वाढतील ते खातात. ते आवडले, का नावडले ह्याची चर्चा करीत नाहीत. एकदा एका मानलेल्या मुलीकडे जेवावयास गेले होते. संध्याकाळी मी सहज विचारले, तेव्हाच मला म्हणाले, “अग, तिला माहीत असूनही तुपात भिजलेला शिरा केला होता. खावा लागला!" रेशनच्या दिवसांत आम्ही नेम केला होता की काळ्या बाजारात एक पैचा जिन्नस घ्यावयाचा नाही; जे रेशनमध्ये मिळेल ते खायचे. फक्त अधूनमधून माझ्यातले गहू कोणाला देऊन त्या बदल्यात बाजरी मिळाली तर मी घेत असे. आजोबांनी तांबडा मायलो, मक्याच्या भाकऱ्या, उकड्या तांदुळाचे जिन्नस, सर्व काही खाल्ले, आणि संतोषाने; कुरकूर न करता. जी साखर मिळे त्यातला थोडा जास्त वाटा त्यांना देत असू, पण कधी काळ्या बाजारातली साखर आणावी लागली नाही. गुळाच्या पोळ्या गुळाचे, बेसनाचे किंवा मुगाचे किंवा कणकीचे लाडू, गुळाची केकसर्वच गोडधोड गुळाचे होई. त्यांनी कधी नाक न मुरडता ते खाल्ले, रेशन संपले, साखर आली, आता साखरेचे खातात. रेशनच्या दिवसांतल्या