पान:Bhovara-Iravati Karve.pdf/70

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७० / भोवरा

असतील. शिक्षण व पोटाचा प्रश्न आधी आणि मग विवाहाचा प्रश्न असा जो आजोबांनी निर्णय घेतला तो विधवांनाच नव्हे तर सर्वच स्त्रियांना उपकारक ठरला ह्यात शंका नाही.
 संस्थासंस्थांतही डावे-उजवे आहेच. जोपर्यंत युनिव्हर्सिटीचे केंद्र पुणे होते, युनिव्हर्सिटीच्या एकमेव कॉलेजचे प्रिन्सिपॉल व युनिव्हर्सिटीचे रजिस्ट्रार हिंगण्याचे आजीव सदस्य होते, तोवर आजोबांच्या मनात हिंगण व युनिव्हर्सिटी हा भेदभाव नसावा. हिंगण्याची संस्था युनिव्हर्सिटीची जन्मदात्री. मुलगी कायम आईशी संलग्न राहील असे त्यांना वाटत असावे. खरोखर पाहता विद्यापीठ मुंबईस जावयाचे- ते तसे जावे म्हणून ठाकरसीबाईंची धडपड, तर ते पुण्याहून जाऊ नये अशी हिंगण्याच्या मंडळींची इच्छा. येथेही आश्रमाच्या प्रेमाने उचल खाल्ली व आजोबांना सर्व वादविवादात त्रयस्थाची भूमिका घेता आली नाही; आणि सर्वांनाच अतोनात त्रास सोसावा लागला. ह्या सर्व प्रसंगातही त्यांनी पुढाकार घेत नाही. इतर बरीच जणे होरपळून निघाली. पण हे मात्र सहीसलामत सर्व मानसन्मानासह होते तेथे राहिले. तरीही त्यांचे प्रेमाचे पहिले स्थान हिंगण्याची संस्था हेच राहिले आहे. एखादे पत्र वाचून आजोबा विशेष प्रसन्न दिसले म्हणजे हिंगण्याला काही पैशाचे दान त्या पत्रातून मिळाले असले पाहिजे, असा गौरीचा ठाम सिद्धांत आहे! परगावचे कोणी भेटण्यास आले तर अजून उत्साहाने सांगतात, "अहो, तुम्ही हिंगण्यास जा. तिथला आश्रम ही एक फार उत्तम संस्था आहे." त्यांचे प्रेम आग्रही व अहंकारी नाही. पुष्कळ आजीव सदस्यांना वाटते की आपल्याशिवाय संस्था चालायची नाही. त्यामुळे सर्व सूत्रे ते हाती ठेवतात; सर्व कामे मोठ्या हिरीरीने अंगावर घेऊन पार पाडतात; इतरांना वाव देत नाहीत. आजोबांनी तसे केले नाही. त्यामुळे संस्थेचे सर्वच सभासद संस्थेच्या उत्कर्षासाठी झटले. अण्णांच्या मोठेपणाच्या सावटाखाली त्यांचे कुटुंबीय व सहकारी खुरटले नाहीत.
 कित्येक मोठ्या माणसांना आपले असे काही वैशिष्ट ठवावेसे वाटते.शरीराबद्दल अनास्था हे तर मोठेपणाचे लक्षणच मानले जाते. आजोबांची वृत्ती अशी मुळीच नाही. शरीराचे चोचले करायचे नाहीत, पण शरीर हे वैरी आहे असे म्हणून त्याला दंडही करायचा नाही,अशी त्यांची वर्तणूक