पान:Bhovara-Iravati Karve.pdf/7

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भोवरा / ७

म्हणून जातात; पण बरेचसे कुठेतरी निराळ्या ठिकाणी जायचे म्हणून, बदल हवा म्हणून जात असतात.
 रस्त्याने फिरायला गेले की कितीतरी घरांवर व दुकानांवर पाट्या दिसायच्या, “विकाऊ आहे." मला दर वेळीं वाटायचे- “अरेरे! फारच डबघाईला आला बिचारा. दुकान, घर विकावं लागत आहे." काही दिवसांनी मला कळले की पैशाची खोट आली म्हणून काही लोक घरे आणि दुकाने विकीत नाहीत; तर त्यांना एके ठिकाणी राहण्याचा कंटाळा आला म्हणून. आठ वर्षांपूर्वी भेटलेल्या माणसांपैकी एक की दोन त्याच गावात, त्याच घरी, त्याच नोकरीत होती. बाकी सर्व इकडची तिकडे झाली होती.
 सगळ्यांत मौज म्हणजे स्वतःच फक्त हिंडायचे व मग जावे त्या ठिकाणी नवे घर बघायचे, नवे साहित्य विकत घ्यायचे, नव्याने घर सजवायचे. त्या भानगडी नकोत म्हणून ह्या लोकांनी घरांनाच चाके बसविली आहेत. काही काही घरे साठ फूट लांब व वीस फूट रुंद असतात. त्यांना आठ किंवा दहा चाके, अशी घरे प्रचारात आली की त्यांना ओढून नेणाऱ्या मोटरगाड्या तयार होतात. कंपन्या निघतात. एका गावाहून दुसरीकडे जायचे म्हणजे घरासकट जायचे! माणसे हिंडतात, त्यांची घरे पण हिंडत असतात.
 लाइबनिट्झ म्हणून एक प्रख्यात तत्त्ववेत्ता होता. विश्वरचनेबद्दल त्याची मोठी मजेदार कल्पना होती. सर्व विश्व अणुमय आहे. अणूचे नाव मोनाड. पण हे अणू निर्जीव, निरात्म नाहीत, हे आत्माणू सर्वथैव स्वतंत्र, स्वयंसिद्ध व स्वयंपूर्ण असे आहेत, असे त्याचे म्हणणे होते. ह्या संख्यातीत, स्वतंत्र आत्म्यांचे मिळून विश्व बनले कसे? एकमेकांशी त्यांचा संबंध मुळीच नाही का? लाइबनिट्झच्या मते संबंध फक्त एवढाच होता की, ह्या प्रत्येक बंदिस्त आत्मारूपी अणूला एक एक खिडकी असते व त्या खिडकीत इतर सर्व अणू प्रतिबिंबित झालेले असतात. हाच एका मोनाडचा दुसऱ्या मोनाडशी संबंध.
 कधी जुन्या काळी कॉलेजात शिकलेल्या ह्या सिद्धांन्ताची मला राहून राहून आठवण येई. एक मोठा भोवरा फिरत आहे. त्याच्या तळाशी गती इतकी थोडी की स्थिरत्वाचाच भास व्हावा. तिथे आम्ही वर्षानुवर्षे, जन्मच्या जन्म, एकमेकांजवळ घालवतो तरी आत्म्याला आत्मा मिळत नाही