पान:Bhovara-Iravati Karve.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



भोवरा / ६९

पोटापाण्याची व्यवस्था करणे संस्थेचे एक प्राप्त कर्म होते व ते करताना जिल्ह्याच्या ठिकाणी नवी शाळा काढण्यास त्यांना मदत करून संस्थेने व आजोबांनी दोन समाजकार्ये साधली. पण त्यावरून आजोबांची तुलना योग्य नव्हती हेही कळते. ह्या तुलनेमुळे बऱ्याच बी.ए.बायका चिडल्या असल्यास नवल नाही.
 एकदा जिव्हाळा म्हटला म्हणजे संगती-विसंगती ही बुद्धिप्रामाण्ये लुळी पडतात. मी फार उंच म्हणून सासूबाई नाक मुरडीत व “काय दीपमाळ आहे!" म्हणून म्हणत. माझी मुलगी जाई अशीच उंच झाली तेव्हा म्हणत, “दिनूची मुलगी काय सुरेख उंच वाढली आहे!" संस्थेच्या बाबतीत आजोबांची वृत्ती अगदी तशीच होती. इंग्रजीतून शिकण्याने, गणित विषय सक्तीचा असल्यामुळे स्त्रियांच्या मेंदूला शीण होतो; त्यांचे असे विशेष विषय त्यांनी शिकावे, म्हणून स्त्रियांची युनिव्हर्सिटी निघाली. ह्यांतील काही जी. ए. स्कॉलरशिप मिळवून विलायतेला गेल्या तेव्हा आजोबांना फार आनंद झाला. परदेशात विदेशी भाषेतून शिक्षण घेण्याने ह्या स्त्रियांच्या मेंदूला त्रास होईल असा विचारही त्यांच्या मनात आला नाही. उलट आमच्या जी. ए. पदवीधर बी. ए. ची बरोबरी करू शकतात म्हणून भरपूर जाहिरात झाली. प्रेमाच्या राज्यात तर्काला जागा नाही आणि आजोबांचे एकमेव प्रीतिस्थान त्यांच्या संस्था, तेव्हा ते असे वागले तर नवल नाही. संस्थेच्या बाबतीत तरी ते केवळ छाया नसून हाडामासाचे माणूस आहेत हे पटते.
 आजोबांच्या संस्थेवरील प्रेमामुळे जसे कुटुंबाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले असे वाटते, तसेच संस्थेत शिकण्यास आलेल्या काही व्यक्तींबद्दल झाले असा माझा समज आहे. संस्थेत आरंभी आरंभी बऱ्याच विधवा शिकल्या. काही थोड्यांनी पुनर्विवाह केला. पण बऱ्याच अशा विधवा होत्या की पुनर्विवाहासारखे वय असूनही आजोबांनी त्यांच्या हाती जबाबदारीची कामे सोपवली व विवाहाचा प्रश्न पुढे आणलाच नाही. कदाचित् असेही झाले असेल की, ह्या विधवांनीच पोटापुरते मिळून प्रतिष्ठेने समाजसेवा करता येत आहे, तर विवाह नको, असा निर्णय घेतला असेल. कदाचित् हिंगण्याची संस्था व पुनर्विवाह हे विषय अगदी वेगवेगळे ठेवण्याच्या आजोबांच्या संकल्पामुळे येथे शिकाऊ बाया त्यापासून दूर राहिल्या