पान:Bhovara-Iravati Karve.pdf/68

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६८ / भोवरा

त्याने आजोबांना कळवले. आजोबा या बेताच्या विरुद्ध होते. आणखी शिकून काय करायचे? खर्च फार येईल, मी आता तुला युनिव्हर्सिटीत नोकरी देतो, वगैरे त्यांनी सांगितले. दिनकरला ते पटले नाही. तो म्हणाला, "आम्ही पैशाची काही व्यवस्था करू." एवढी बोलणी झाली व आजोबा कुठे गावाला गेले. नंतर पैसे कर्जाऊ मिळून माझे जायचे ठरले. बोट निश्चित झाली. तेव्हा दिनकरने वडिलांना एक कार्ड लिहिले की, “अमक्या बोटीने इरावती जर्मनीला जात आहे, आपला आशीर्वाद असावा" पत्राचे उत्तर ताबडतोब आले की, “माझे म्हणणे मी तुला कळवलेच आहे. हिने जावे असे मला वाटत नाही." संपले. आशीर्वाद वगैरे कुछ काही नाही! ह्या गोष्टीचे शल्य माझ्या मनाला बरेच दिवस वाटत असे. त्यातूनही अभ्यासांत कधी विशेष मन घातले नाही, अशा बायांना जेव्हा त्यांनी मोठ्या उत्साहाने विलायतेला जाताना आशीर्वाद दिले, तेव्हा तर मला फारच राग आला. पण त्यांच्या ह्याही कृत्याची संगती लागली व मला त्याचे काही वाटेनासे झाले. ती संगती अशी : एकदा एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही म्हटले, म्हणजे उगीच तोंडदेखला आशीर्वाद देण्याची आजोबांची वृत्ती नाही. रागाने शाप देणे त्यांना शक्य नाही, पण उपचार म्हणून आशीर्वाद देणेही त्यांना जमणार नाही. दुसरे, ज्या बायांच्या विलायतयात्रेबद्दल त्यांनी उत्साह दाखवला त्या सर्व त्यांनी काढलेल्या स्त्रियांच्या युनिव्हर्सिटीच्या पदवीधर होत्या. आजोबांनी जे हृदय सर्व माणसांपासून चोरून ठेवले ते त्यांनी आपल्या संस्थांना, विशेषतः हिंगण्याला दिले आहे.
 संस्थेबद्दल त्यांना फार आपुलकी वाटे व अजूनही वाटते आणि ह्या आपुलकीपुढे त्यांची उदासीनता पार कुठच्या कुठे लोपते. सासूबाई मुलांच्या व सुनांच्या जिव्हाळ्यामुळे चारचौघांत वेळीअवेळी त्यांची स्तुती करीत. दुसऱ्याशी तुलना करून माझी मुले व सुना किती चांगली ह्याचे वर्णन करीत. अगदी तीच तऱ्हा आजोबांची त्यांच्या संस्थांबद्दल होती. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात मुंबई विद्यापीठाच्या बी.ए.बाया व त्यांच्या विद्यापीठाच्या जी.ए.बायका ह्यांची एक अगदी नावनिशीवर यादी देऊन बी.ए.बायका काही समाजकार्य करीत नाहीत व जी.ए.बायका मात्र ते करतात हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी दिलेल्या यादीतील बऱ्याचशा जी.ए.बाया विधवा होत्या. त्यांच्या पदवीला सरकारात मान्यता नव्हती. त्यांच्या