पान:Bhovara-Iravati Karve.pdf/67

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / ६७कथा, कादंबऱ्या, कविता ह्यांत त्यांना कधी गोडी वाटली नाही ह्याचे कारणही भावनांच्या कल्लोळापासून दूर राहावयाचे हा जो त्यांचा स्वभाव, तेच असावे.
 त्यांच्या संस्था काढण्याच्या कृतीतही असेच एक विशिष्ट मर्यादेत आखलेले वर्तन दिसते. मनात आले की संस्था काढायची. ती काही उत्तम कार्यक्षम माणसांच्या हवाली करायची व आपण वर्गणी जमवायची. संस्थेच्या दैनंदिन कारभारात त्यांचे लक्ष नसे. संस्थेमध्ये आपण मुख्य म्हणून अधिकार गाजवावा असेही कधी त्यांच्या मनात आले नाही. खर्च जास्त होते असे वाटले, तर ते कधीकधी एखादे वाक्य बोलत. एरवी कडाक्याचे वादविवाद होऊन आजीव सेवकांचे खून होण्याची पाळी आली तरी ते आपले स्वस्थ बसत. किती विषय शिकवावेत, कसे शिकवावेत, वगैरे विषय युनिव्हर्सिटीत येऊन त्यावर किती जरी काथ्याकूट झाला तरी ते कधी बोलले नाहीत. हिशेब चोख आहेत ना, वर्गणीदारांना कार्डे वेळेवर गेलीत ना, नवे वर्गणीदार किती झाले, जुने किती गळले, ह्याकडे त्यांचे लक्ष असते. आपले सहकारी संस्था नीट चालवतील ना, अशी शंकाही कधी त्यांच्या मनात आली नाही. ज्या तऱ्हेने त्यांनी मुलांच्या संसारात कधी लक्ष घातले नाही. त्याच तऱ्हेने संस्थांच्या संसारातही मन घातले नाही. वर्गणीचे काम करावयाचे. त्यातून निवृत्त झाल्यावर फक्त समारंभास जातात. अमके कसे चालले आहे, तमके कसे चालले आहे, त्याची चौकशीसुद्धा करीत नाहीत. त्यांना फार निःस्वार्थी व कर्तबगार आजीव सेवक मिळाले; व त्यांनी संस्था नावारूपाला आणल्या. हा अलिप्तपणा म्हणा, किंवा वादविवाद व भांडणांला भिणारा स्वभाव म्हणा, तो नसता व त्यांनी युनिव्हर्सिटीच्या भांडणांत पहिल्यापासून लक्ष घातले असते तर युनिव्हर्सिटी गोडीगुलाबीने मुंबईला जाती आणि सर्वांचेच कष्ट व मनाचा निष्कारण त्रास वाचला असता.
 आजोबांचा आयुष्यमार्ग असा ठराविक आहे. ते आपले सरळ त्या वाटेने जातात. उगीच उपचार व दंभ त्यांना मुळीच माहीत नाहीत. एकदा आपले ठरले ते खरे. सरळ त्या वाटेने मुकाट्याने जावयाचे. ह्यावरून एक मजेदार प्रसंग आठवला. मी एम्. ए. झाल्यावर जर्मनीत पुढच्या अभ्यासासाठी जावे असे दिनकरने (माझ्या नवऱ्याने) ठरविले. त्याप्रमाणे