पान:Bhovara-Iravati Karve.pdf/65

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेभोवरा / ६५

घेऊन, चार चार मित्रांच्या द्वारे चौकशी करून सर्वस्वी अनोळखी विधवेशी लग्न करण्यास लागणारी धडाडी आजोबांनी दाखवली असतीसे वाटत नाही. म्हणजे असे की, विधवेशी लग्न लावण्याची त्यांची तयारी होती, पण त्यासाठी काही खटाटोप- विशेषतः चार लोकांकडे जाऊन चौकशी वगैरे करण्याचा त्यांना जमला नसता. जात्या अबोल स्वभाव, घरातसुद्धा फारसे न बोलणारे, आणि जन्मभर काम केले वर्गणी मागण्याचे, हाही विरोध मजेदार नाही का? पण त्यांनी एकट्याने हिंडून फारशी वर्गणी मागितली नाही. कोणी तरी खटपट करणारे असे बरोबर असे. वर्गणी मागतानाही ते फारसे बोलत नसत. व्यासपीठावरून मात्र फार सुंदर, मुद्देसूद व कळकळीने ते बोलत. त्यांचे थोरले चिरंजीव अप्पासाहेब घरात असेच अबोल असत. मग त्यांनी स्वतःचे असे एक मासिक काढून वर्षानुवर्षे त्यांतील मजकूर स्वतः लिहून काढून घरातल्या अबोलपणाचा वचपा काढला.
  ही माणसे माणूसघाणी नव्हेत; पण आपण होऊन ओळख काढणे, परक्या माणसाला आपण होऊन एखादा प्रश्न विचारणे, माणसाच्या मनाचा ठाव घेण्यास बघणे, भोवतालच्या माणसांशी समरस होणे, ह्यांना जमत नाही. ती आपले हृदय क्षणभरही गमवावयास तयार नसतात. माणसाने माणसाशी समरस होण्यात आनंद असतो खरा, पण त्याचबरोबर दुःखाचे वाटेकरी होण्याचाही संभव असतो. जीवनाच्या शांत, धीम्या प्रवाहात त्यांना भावनांची खळबळ नको असते. आनंदाचा पूर नको, क्रोधाची आग नको; दुःखाचे चटके नकोत- म्हणून ह्यांचा माणसांशी संपर्क दुरून दुरून असतो. ह्यांच्या सहानुभूतीचा उगम भावनेत नसून बुद्धीवर आधारलेला असतो. प्रत्यक्ष कृतीच्या दृष्टीने कदाचित ही भूमिका फलदायी असेल; पण शेजारी असणाऱ्याला पुष्कळदा असे वाटते की आपल्या घरी माणस वावरते की माणसाची छाया!
 आजोबा मैलन् मैल चालले असतील; पण चालत असताना भोवतालच्या सृष्टीच्या सौन्दर्याकडे त्यांचे लक्ष गेले असले, तरी निदान मला उमगेल अशा तऱ्हेने नव्हे. उकडते आहे की गारवा आहे, जमीन कोरडी आहे की चिखलाने चिकचिकाट झाला आहे, ह्याबद्दल कधी तरी ते बोलताना ऐकले आहे पण आकाश निळेशार आहे की ढगांनी भरले आहे,