पान:Bhovara-Iravati Karve.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६४ / भोवरा

लावून देणे, वगैरे कामे रात्रंदिवस कमळाबाई, नानासाहेब आठवले व मधूनमधून दिनकर इतकी जणे करीत होती. आजोबा सिंडिकेटमध्ये होते. आम्ही त्यांना म्हणत होतो, की आळ खरा की खोटा हे आम्ही पाहून घेतो, पण “कमळाबाई असं करतीलसं वाटत नाही" एवढे एक वाक्य तुम्ही म्हणा. तुमच्या गप्प बसण्याने लोक नाना कुतर्क काढतात. पण हरे राम! ह्यांनी काही ते वाक्य तोंडून काढले नाही. कमळाबाई काही इतर अनाथ विधवांप्रमाणे आश्रमात आलेल्या नव्हत्या. त्या हुजूरपागेच्या विद्यार्थिनी. खऱ्या म्हणजे फर्गसन कॉलेजात जायच्या. पण तात्यासाहेबांनी मोठ्या ध्येयवादाने त्यांना स्त्रियांच्या युनिव्हर्सिटीत घातले. त्या वेळी युनिव्हर्सिटीने केवढी जाहिरात केली होती! त्यांनी आपले आयुष्य संस्थेच्या सेवेला वाहिलेले, पण आजोबा काही एक साधे वाक्य त्यांच्याबद्दल बोलायला तयार नव्हते, हे पाहून मला फार राग आला होता. हा प्रसंग एकच नव्हे. ज्या सहकाऱ्यांनी सर्वस्व देऊन संस्था नावारूपास आणली, त्यांच्यावर. काही अशा तऱ्हेचा प्रसंग आला तर हे आपले अलिप्त राहात.
 वर्गणी मागायला जायचे खरे, पण दुसऱ्या कोणाला तरी पुढे करून अशा एका वेळेचे श्री. मायदेवांनी वर्णन केले आहे. कोण्या श्रींमताकडून अपमान झाला तर “मला कशाला इथं आणलंस?" म्हणून मायदेवांवर रागावले. अशा तऱ्हेचे प्रसंग नानासाहेब आठवले, हरिभाऊ दिवेकर या सर्वांवर आले. ज्याने त्याने आपले पाहून घ्यावे; आजोबा कशात मन घालतील, कोणाची कड घेतील ही गोष्टच कधी झाली नाही. घरातही तोच प्रकार. सासूबाई आमच्याकडे राहायला आल्या होत्या. आमची काही कुरबूर चाले. पण ह्यांचे आपले कशातच लक्ष नाही. ह्या सर्व कृतीच्या बुडाशी कठोरपणा किंवा आप्पलपोटेपणा नसून कमालीचा भिडस्त, भित्र स्वभाव आहे असे मला वाटते. त्यांच्या आत्मचरित्रात एका प्रसंगाचे वर्णन आहे. खोटा आळ येऊन छड्या खाण्याचा प्रसंग आला होता. त्यांनी आपला कपाळाला हात लावला आणि ते पाहून साहेब हेडमास्तरांनी खऱ्याखोट्याची चौकशी केली व ते प्रसंगातून निभावले; पण निक्षून, न डरता आपल्या निरपराधीपणाची ग्वाही काही त्यांना देता आली नाही. जातीच्या भित्र्या व लाजाळू माणसाने इतकी कामे करावीत हा विरोध मला मोठा मग वाटतो त्यांचे सहकारी नरहरपंत ह्यांची बहीण विधवा नसती तर पुढाकार