पान:Bhovara-Iravati Karve.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / ६१

कधी काही आणायच्या. “हे जेवताना वाढून घे" म्हणायच्या. यावरून आमचा पहिला खटका उडाला. मी म्हटले, "मी घरचं ओलंकोरडं आनंदाने खाईन, पण तुम्ही वाटेल तिकडून मागून आणता ते खाणार नाही. नवऱ्याला वाढणार नाही." सासूबाईंनी परत कधी आमच्याकडे काही आणले नाही. सुनांना कोणालाच ते खपत नव्हते; पण आजोबा मात्र सासूबाई पुढे ठेवतील ते खात. ते आपण दिलेल्या पंचेचाळीस रुपयांतले, की मागून आणलेले ह्याची कधी वास्तपुस्तच होत नसे. मला पहिल्यापहिल्याने ह्या वागणुकीचा अर्थच लागत नसे; पण आता पंधरा वर्षे आजोबांबरोबर राहून मी मनाशी एक संगती लावली आहे. ती बरोबर आहे असे मला म्हणता येणार नाही. पण ती त्यांच्या स्वभावाला धरून आहेसे वाटते.
 मी वर ‘अपरिग्रह' असा शब्द वापरला, तो आजोबांचा नव्हे. ते कधीच जाडेजाडे शब्द वापरीत नाहीत. त्यांच्या वागणुकीचे मर्म म्हणजे एक, स्वतः लोकांचे काही घ्यावयाचे नाही; व दुसरे आपल्याला योग्य वाटेल ते आपण करायचे, दुसरा काय करतो ते पाहायचे नाही. पैकी घ्यायचे म्हणजे आजोबांच्या मते फक्त पैसे. कोणी पैसे दिले तर ते ताबडतोब आश्रमाकडे जातात. फलटणच्या राजेसाहेबांनी त्यांना खास स्वतःला म्हणून पन्नास रुपये महिना दिलेले आहेत. ते चालू झाल्यापासून आजोबा फक्त सहीचे धनी आहेत. पैसे जातात संस्थेकडे. कोणी त्यांनी वापरावी म्हणून वस्तू दिली; त्यांना काही खाण्यासाठी दिले; मोटरीत घेऊन गेले, तर ते आजोबा मोठ्या आनंदाने स्वतःसाठी स्वीकारतात, ते आपण घेता कामा नये किंवा परत केले पाहिजे अशी त्यांची भावना नाही. ते कुठचीच गोष्ट अतिरेकाला नेत नाहीत. ‘अपरिग्रह’ बगैरे मोठ्या गोष्टीत ते पडत नाहीत. कोणाचे पैसे घेत नाहीत-इतर काही कोणी प्रेमाने दिले तर नाही म्हणत नाहीत.
 दुसरे म्हणजे, काय त्यांचे नियमबियम असतील ते स्वतःपुरते. आपल्याप्रमाणे इतरांना करण्याच्या फंदात ते पडत नाहीत. चालवले तोवर ते न चुकता आठ मैल रोज चालत असत; पण व्यायामाबद्दल कोणाला व्याख्यान देताना मी कधी ऐकले नाही. त्यामुळे बायको, मुले-प्रत्येक जण आपल्याला योग्य दिसेल ते करीत होती. आजोबांनी त्यांच्यावर कसलेच बंधन घातले नाही. त्यांचे स्वतःचे जीवन ते जगतात; इतर काय करतात,