पान:Bhovara-Iravati Karve.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६० / भोवरा

आणि फराळाचे घरी केलेस का बाजारचे आणलेस, ह्याची चौकशी करण्याचे कधी त्यांच्या मनातही आले नाही.
 आजोबांनी शंभर वर्षांच्या आयुष्यात कधी पैशाचा तरी जिन्नस बाजारातून आणला असेल असे वाटत नाही. सर्व जगभर प्रवास केला. हिंदुस्थानभर वर्गणी गोळा करीत हिंडले, पण कधी स्वतःचे आगगाडीचे तिकीट काढले नसेलसे वाटते. लोक तिकीट काढीत, हे पैसे देत. स्वतःच्या कपडयांबाबत ते फार काळजी घेत. विशिष्ट तऱ्हेची धोतरे, डोईला बांधायचा रुमाल, विशिष्ट कापडाचा कोट असा त्यांचा पोशाख आहे. पण हे सर्व बाजारातून आणणे, शिंप्याकडे शिवायला टाकणे ही कामे इतर मंडळी करीत- माझ्या आठवणीत सासूबाई व मुले करीत. एकदा अप्पांना ब्लॅकेट आणावयास सांगितले. मला वाटते, कुठे दूर प्रवास करायचा होता. घरातली सर्व पांघरूणे जीर्ण, परत परत शिवलेली, तेव्हा जरा नवे ब्रॉकेट घ्यावे, असा विचार झाला होता. अप्पांनी वडिलांसाठी म्हणून एक मऊ, दुरंगी ब्लँकेट आणले. किंमत रुपये साठ! आजोबांचे पेन्शन रुपये सत्तर. आजोबांनी मुकाट्याने साठ रुपये दिले व परत रघुनाथाला काही जिन्नस विकत घ्यायला सांगायचे नाही म्हणून मनाशी खूणगाठ बांधली. आजीबाईंनी खूप तळतळाट केला. ते ब्लँकेट म्हणजे सबंध घरात मोठा थट्टेचा विषय झाला. पण आजोबा मात्र काही बोलले नाहीत.
 ब्लॅकेटवरून गोष्ट निघाली म्हणून सांगते. ह्या किंमती मालाचे पैसे अप्पांनी दिले असते. इतरही मुलांनी दिले असते. पण आजोबा स्वतःसाठी इतरांची- म्हणजे मुलांचीसुद्धा- पै घेत नसत. पोस्टाचे तिकीट जरी लागले तरी त्याचे पैसे ताबडतोब हातात ठेवीत. त्यांनी स्वतः व इतरांनी ह्या गोष्टीबद्दल लिहिले आहे. पण मला कित्येक दिवस हे उमजले नव्हते.मी म्हणे (अर्थात मनाशी) की पन्नास वर्षे बायको काय नेसते आहे कुणाकडून काय मागून आणते आहे, ह्याची दादही नाही- हा अपरिग्रह कोण्या गावाचा? सासूबाई बहुतेक रोज गावात जात. कधी संस्थेसाठी वर्गणी मागत; कधी आत्मचरित्राच्या प्रती खपवीत, कधी बाळगलेल्या मुलांसाठी धान्य, वस्त्र वा पैसा मागत;-कधी स्वतःसाठी मागत. माझे लग्न होऊन नुकताच संसार थाटला होता. गावात जाण्यासाठी आमचे जिमखान्याचे घर्ष जवळ पडे म्हणून सासूबाई आमच्याकडे राहायला होत्या. त्या डब्यातून