पान:Bhovara-Iravati Karve.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



भोवरा / ५९

एका शब्दानेही त्यांना बोलले नाही. शंकरराव कधी पाच वर्षांनी नाही तर दहा वर्षांनी पुण्यास यायचे. ते यायचे कळले म्हणजे “शंकर येणार, शंकर येणार. त्यानं माझ्याकडे राहिलं पाहिजे. तुम्हा कुणाकडे एक दिवस राहू देणार नाही !” म्हणून सासूबाईंची नुसती धांदल उडायची. अर्थात् सासूबाईंकडे कंटाळून दोन दिवसांतच शंकरराव कोणा तरी भावाकडे जात. पण तरीही शंकर असेपर्यंत त्यांचा आनंद उतू जाई. ते जायचा दिवस जवळ आला की त्यांच्या जिवाची घालमेल होई. बोलता बोलता डोळ्यांत पाणी येई. “शंकर आता नाही रे परत दिसणार!" म्हणून त्या वारंवार म्हणत. शंकररावांच्या पोटातही कालवून येई. ते म्हणत, “हिच्या दुःखामुळं भेटीगाठीचा आनंद पार नाहीसा होतो.” सासूबाईंच्या दु:खामुळे आम्ही पण कष्टी असायचो. एक अचल तेवढे आजोबा! “शंकर आलास का?.... शंकर जातोस का?" संपले. “जैसी गोरुवे रुखाखाली बैसली”
 आजोबा सर्वांशी सारखेच वागत; पण आप्पांच्या (कै. रघुनाथराव, थोरले भावजी) सांगण्यात येई की, आजोबांची त्यांच्याबाबतची वागणूक कठोर व कर्तव्यनिष्ठ होती. अप्पांना कॉलेजात जाईपर्यंत शेंडी- हजामत करून घेरा ठेवून ठेवावयास लावली होती. नाटक पाहण्याची सक्त मनाई होती आणि गंमत म्हणजे सर्व मुलांना, विशेषतः आप्पा व शंकरराव ह्यांना नाटकाचा शौक भारी. अर्थात् चोरून नाटके पहावी लागत. सासूबाई व आजोबा ह्यांच्या कचाट्यातून बाहेर पडण्याची जरूरी ह्या दोघांना विशेष वाटली.- आणि लहानपणाच्या काटकसरीची, कंजूष संसाराची प्रतिक्रिया म्हणून की काय ही दोघेही मुले बरीच खर्चिक बनली. स्वतःचे लहानपण आठवून शंकररावांनी आपल्या मुलाच्या एकाही हौसेला नाही म्हटले नाही. अर्थात् सासूबाई ह्या खर्चावर फार रागावत आणि मुलगा दाद देत नाही तर सुनेवर राग निघे. साधासाधा खर्चही त्यांना वावगा वाटे. बोलण्याने बोलणे वाढे व कटुता उत्पन्न होई. आजोबा अगदी ह्याउलट. त्यांनी कधी एका अक्षरानेही ह्याबद्दल विचारले नाही. अर्थात् आम्हा सुनांनाही आजोबा फार प्रिय. सासूबाई आल्या म्हणजे आता ह्या काय बरे म्हणतील, असे वाटे आजोबांच्या पुढे हापूस आंबे ठेवले म्हणजे आस्वाद घेऊन मोठ्या आनंदाने खात. ते आंबे स्वस्त की महाग विचारीत नसत. चहा-फराळाचे खात. आता चहाची वेळ आहे का नाही ? सकाळचा हा कितव्यांदा चहा झाला?