पान:Bhovara-Iravati Karve.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / ५७

बोललेले नाहीत. सासूबाई म्हणत, "आधी सर्व दिवसभर बाहेर असायचं. रात्रीचं जेवण झाल्यावर काही घरगुती विषय (आजोबांच्या मते, कटकट) काढावा. तो हे आपले भिंतीकडे तोंड करून निघून जात. मग काय करायचं? किती कटकट केली तरी हे बोलायचे नाहीत व मनचं करायचं सोडायचे नाहीत.”
 ‘मनचे करायचे’ हे प्रकरणही मोठे गमतीदार. आजोबांच्या आत्मचरित्रावरून दिसते की एखादा विचार मनात आला की ते दिवसेन् दिवस, महिनेन् महिने त्यावर विचार करीत. एकदा विचार पक्का झाला की कृती करीत. त्यांनी कृती केली म्हणजे त्यांचे विचार लोकांना समजायचे. हिंगण्याचा आश्रम काढल्यानंतरची गोष्ट. आजोबा फर्ग्युसन कॉलेजात प्रोफेसर होते. त्यांनी कोणाला न कळवता सवरता एक दिवस आपली तीन हजारांची पॉलिसी आश्रमाच्या नावाने करून दिली. सासूबाई सांगत, “अग, पुनर्विवाह केल्यामुळे पहिल्या सासरला मुकले, माहेराला मुकले. नव्या सासरच्या मंडळींनी वाळीत टाकलेलं. त्यातून शंकर झालेला. विधवा बाईला पोळपाट-लाटणं असतं; तोही मार्ग बंद. काही बरेबाईट झाले तर जीव देण्यावाचून मार्ग नव्हता मला! खूप रडले, खूप आदळ आपट केली, पण ह्यांना काही पाझर फुटला नाही. तेव्हा ठरवलं की ह्या संसारात मलाच माझी व मुलांचं बघितलं पाहिजे आणि त्याप्रमाणे केलं!
 ‘मलाच माझे व मुलांचे बघितले पाहिजे’ ह्याप्रमाणे त्यांनी केलेही. आजोबा शंभर रुपये पगारापैकी पंचेचाळीस रुपये घरात खर्चासाठी देत. त्या दिवसांत स्वस्ताई होती तरीदेखील नवराबायको, तीन मुले आणि इतर दोघेतिघे तरी कोणी घरात असत. इतक्यांचे एवढया पैशात कसे होत असेल ह्याचा त्यांनी कधी विचारच केला नसावा असे वाटते. सर्व स्वस्तात स्वस्त करून शिवाय दोन पैसे गाठी बांधायचे ह्या विवंचनेत सासूबाईंचा संसार कसा झाला असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. आजोबांचा बराच वेळ बाहेर जायचा, पण मुले घरीच; म्हणून काहींच्या मनात तरी सासूबाईंबद्दल अढी बसली. “आमच्या घरी खेळगडी घेऊन जायची आमची कधी छाती झाली नाही... बी. ए. च्या वर्गात गेल्यावर मला पहिला कोट शिवला... बायाला (सासूबाईंना) भांडी घासायला मी कितीदा मदत केली...” असे मुले सांगतात. सासूबाई- आजोबांच्या लग्नाचा पन्नासावा