पान:Bhovara-Iravati Karve.pdf/56

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५६ / भोवरा

"गांधारी शंभर पुत्रांस नव्हे तर शंभर दु:खांस प्रसवली." मला वाटते, ह्या उद्गारात साऱ्या जीवनाचे व मायेच्या गुंफणीचे तत्त्व गोवले आहे. आजोबांच्या शंभर वर्षांच्या आयुष्यात किती तरी प्रेमाची माणसे व सहकारी गेले. आईवडील, दोन बायका, मुले, नातवंडे व किती तरी सहकारी. सासूबाई व थोरले भाऊजी गेले त्याला तर अशी काही फार वर्षे लोटली नाहीत, त्यांची आठवण काय होत नसेल?
 थोरले भाऊजी गेले त्या दिवशी पुण्यातील लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत समाचाराला येऊन गेले. एक गृहस्थ सकाळचेच आले होते. त्यांच्याजवळ आजोबा चार शब्द बोलले; आणि ते काय, तर "आता त्याच वय झालेलं होतं- प्रकृतीहि बरी नव्हती. एक दिवस माणूस जायचंच." भेटायला आलेला गृहस्थ तर हे उद्भार ऐकून आश्चर्याने थिजलाच; पण मलाही धक्का बसला. कुटुंबियांविषयी त्यांची वृत्ती ‘जसी गोरुवे रुखाखाली बैसली’ अशा तऱ्हेची आहे. दुपारच्या उन्हात गायी-बैल झाडाखाली बसतात; थोड्या वेळाने निघून जातात, काही नवे येतात. तसे कुटुंबाचे आहे.
 ते घरात आहेत, पण घरातल्या माणसांशी संबंध जवळजवळ नाही म्हटला तरी चालेल. माझी लेक त्यांची एक नात-फलटणला राहते. गेल्या वर्षी त्यांना नव्याण्णव वर्षे पुरी होऊन शंभरावे वर्ष लागले. तेव्हा काही फलटणकर तिच्याकडे येऊन म्हणाले, "आज तुम्ही आपल्या आजोबांच्या आठवणी सांगा!" ती म्हणाली, "काय सांगू? माझ्याजवळ आठवणी अशा नाहीतच. मी अगदी लहान असताना आजोबा घरी येत असत, पण कधी माझ्याशी बोललेले आठवत नाहीत. मी जरा मोठी झाल्यावर मी त्यांच्याशी जे काही बोलले ते 'आजोबा, पाणी तापलं आहे;- आंघोळीला जाता ना?... आजोबा, चहा झाला आहे.. आजोबा पानं वाढली आहेत... आजोबा, तुम्हांला कुणी भेटायला आले आहे!... ह्या- पलीकडे काही बोललेली स्मरत नाही.” इतर नातवंडांशी ते काही जास्त बोलले असतील असे वाटत नाही. आम्हा सुनांशीही कधी बोललेले मला स्मरत नाही. मुलांशी बोलत असत का, म्हणून खोदखोदून विचारते, पण तेही दिसत नाही. तसे ते फारसे बोलके नाहीत; अगदी अबोल आहेत, असेही दिसत नाही. पण कुटुंबात घरगुती गप्पा झालेल्या आठवत नाहीत. युनिव्हर्सिटीतदेखील सर्व कमिट्यांवर असूनही कधी माझ्या आठवणीत